Join us  

Suresh Raina Emotional Message to Father: "वडिलांच्या जाण्याचं दु:ख..."; सुरेश रैनाचा भावनिक संदेश वाचून तुमचेही डोळे पाणावतील

सुरेश रैनाचे वडिल दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 6:33 PM

Open in App

Suresh Raina Emotional Message to Father: टीम इंडियाचा तडाखेबाज डावखुरा फलंदाज सुरेश रैना याच्या वडिलांचे रविवारी निधन झाले. त्रिलोकचंद रैना असं त्यांचं नाव होतं. अनेक दिवसांपासून ते आजारी होते आणि कॅन्सरशी झुंज देत होते. डिसेंबर महिन्यात त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर सुरेश रैना गाजियाबाद येथील आपल्या निवासस्थानी वडिलांसोबत होता. मात्र रविवारी त्याचे वडिल त्रिलोकचंद रैना यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. गाजियाबादच्या राजनगर येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आपल्या वडिलांच्या जाण्याने दु:खी झालेल्या सुरेश रैनाने आज ट्वीट करत एक भावनिक संदेश लिहिला.

सुरेश रैनाचे वडिल त्रिलोकचंद हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. त्यांनी ऑर्डिनन्स फॅक्टरीत बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यांचे मूळ गाव जम्मू-काश्मीरचे रैनावारी हे होते. १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या घटनांनंतर त्रिलोकचंद यांनी गाव सोडलं आणि ते गाजियाबाद येथील मुरादनगर येथे स्थायिक झाले. आपल्या वडिलांबद्दल लिहिताना रैनाने ट्वीट केले, "वडिलांच्या जाण्याचं दु:ख शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. काल माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने मी माझी सपोर्ट सिस्टीम आणि माझ्या आयुष्यातील सामर्थ्य देणारा एक महत्त्वाचा घटक गमावला. ते शेवटच्या क्षणापर्यंत एका खऱ्या सैनिकाप्रमाणे मृत्यूशी झुंज देत राहिले. बाबा, तुमच्या आत्म्यास शांती लाभो. तुम्ही नेहमीच स्मरणात राहा. आम्ही सारेच तुम्हाला नेहमी मिस करू."

दरम्यान, भारतीय संघाकडून सुरेश रैनाने १८ कसोटी, २२६ वन डे आणि ७८ टी२० सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ७६८ धावा व १३ बळी टिपले. वन डे क्रिकेटमध्ये त्याने ५ हजार ६१५ धावा आणि ३६ गडी बाद केले. तर टी२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १ हजार ६०५ धावा आणि १३ बळी आहेत. १५ ऑगस्ट २०२० ला त्याने धोनीसोबतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. परंतु, IPL मध्ये मात्र तो अद्यापही खेळत आहे.

टॅग्स :सुरेश रैनाभारतीय क्रिकेट संघकर्करोग
Open in App