नवी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्जने (सीएसके) यंदा आयपीएल मेगा लिलावात सुरेश रैनाकडे पाठ फिरविली. रैनासाठी इतर कोणत्याही संघानेदेखील बोली लावली नाही. आता रैना आयपीएल २०२२ मध्ये दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात तो आयपीएलचा नवा संघ गुजरात टायटन्सच्या जर्सीत दिसत आहे.
इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयने आयपीएलमधून माघार घेतली. रॉयच्या जागी रैनाचा संघात प्रवेश करण्याबाबत चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. चाहते टायटन्सच्या जर्सीसह रैनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करीत आहेत.
जेसन रॉयने दीर्घकाळ बायोबबलमध्ये राहिल्यामुळे आलेल्या थकव्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. याआधी रैनाने आयपीएलमध्ये गुजरात लायन्सचे नेतृत्व केले होते. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्जवर स्पॉट फिक्सिंगमुळे दोन वर्षांची बंदी घालण्यात आली, त्यावेळी गुजरात लायन्सने आयपीएलमध्ये दोन वर्षांसाठी प्रवेश केला होता. गुजरात टायटन्सचा संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये उतरणार आहे. या संघात राशीद खान, मोहम्मद शमी, शुभमान गिल या खेळाडूंचा समावेश आहे. आयपीएलमध्ये रैना २०५ सामने खेळला असून, त्याच्या ५५२८ धावा आहेत. त्यात एक शतक आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे.