चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) फलंदाज सुरेश रैनानं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमातून माघार घेतली. ''सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार नाही. रैना आणि त्याच्या कुटुंबीयांना चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण पाठींबा आहे,''असे CSKचे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी सांगितले होते. पण, त्यानं नक्की माघार का घेतली, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. पंजाब येथे राहणारे त्याच्या काकांचं भ्याड हल्ल्यात निधन झाले आणि त्यामुळे रैनानं माघार घेतल्याचीही चर्चा सुरू आहे. CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह हॉटेल रुमवरून वाद झाल्यानं रैना मायदेशी परतला अशीही चर्चा होती, परंतु आता रैनानेच खरं कारण सांगितलं आहे.
संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल खेळवण्यात येणार आहे. पण, रैना मायदेशात का परतला, याचे उत्तर तोच देऊ शकत होता. Cricbuzz ला रैनानं सांगितले की,''बायो-बबलच सुरक्षित नसेल, तर मग कशाला विषाची परीक्षा घ्यायची? माझं कुटुंब आहे आणि त्यात दोन लहान मुलं आणि वृद्ध पालक आहेत. कुटुंबीयांसाठी मायदेशी परतणे, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.''
हा निर्णय घेणं सोपं नव्हते, हेही रैनानं कबुल केलं. ''हा माझ्यासाठी अवघड निर्णय होता. CSK हेही माझं कुटुंब आहे, परंतु दुबईत असताना जेव्हा माझ्या मुलांचे चेहरे डोळ्यासमोर होते आणि येथील कोरोना परिस्थितीही बिघडत चालली होती, त्यामुळे मी परतण्याचा निर्णय घेतला,''असेही रैनानं सांगितले.
धोनीबाबतच्या वादाबाबत रैनानंही स्पष्ट मत मांडलं.''माहीभाई हा माझा मोठा भाऊ आहे. या खोट्या बातम्या आहेत,'' रैनानं स्पष्ट केलं. यावेळी रैनानं दुबईत परतणार नसल्याच्या चर्चांना स्पष्टपणे नकार दिलेला नाही. तो म्हणाला,''मी CSKचा खेळाडूच आहे आणि राहणार... दुबईतील परिस्थिती सुधारल्यास, मी कदाचित परतही जाऊ शकतो. माझ्यासाठी दरवाजे बंद झालेले नाहीत.''