१ ते २९ जून या कालावधीत अमेरिका व वेस्ट इंडिज येथे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातला हायव्होल्टेज सामना न्यू यॉर्क येथे ९ जूनला खेळवला जाणार आहे आणि या सामन्याच्या तिकिटांना खूप मोठी डिमांड आले. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांच्या दाव्यानुसार IND vs PAK लढतीचे एक तिकिट १६ लाखांहून अधिक किमतीला विकले जात आहे. एवढी या सामन्याची क्रेझ आहे. पण, या सामन्यापूर्वीच आता सोशल मीडियावर IND vs PAK सामना पाहायला मिळतोय. भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) याने ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC) आजच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याची आगामी ट्वेंटी-२०वर्ल्ड कप स्पर्धेच्या अॅम्बेसेडर म्हणून घोषणा केली. युवराज सिंग व ख्रिस गेल यांच्यानंतर हा मान पटकावणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. यावरून पाकिस्तानी पत्रकाराने सुरेश रैनाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्याला रैनाने सडेतोड उत्तर दिले. रैनाने त्याला आपण २०११ चा वर्ल्ड कप जिंकला असल्याची पत्रकाराला आठवण करून दिली. त्याचवेळी मोहालीत पाकिस्तानचा केलेला पराभवही रैनाने पत्रकाराला आठवून दिला.