चेन्नई सुपर किंग्स ( CSK) संघासमोरील अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही. शुक्रवारी संघातील गोलंदाज दीपक चहरसह 10 स्टाफ सदस्यांना कोरोना झाल्याचे वृत्त समोर आले. या धक्क्यातून सावरण्यापूर्वी शनिवारी CSKला आणखी एक धक्का बसला. संघाचा उप कर्णधार आणि प्रमुख खेळाडू सुरेश रैनानं कौटुंबिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आणि तो यंदाची आयपीएल खेळणार नाही.
सुरेश रैनानं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर तो आयपीएलमध्ये दमदार कामगिरीसाठी सज्ज होता. 2018मध्ये रैनानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 आणि 2015मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. रैनानं 18 कसोटी, 226 वन डे आणि 78 ट्वेंटी-20 सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानं कसोटीत 768 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. वन डे त त्याच्या नावावर 5615 धावा व 36 विकेट्स, तर ट्वेंटी-20त त्यानं 1605 धावा व 13 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 त शतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.
चेन्नई सुपर किंग्सनं शनिवारी ट्विटवर पोस्ट करून माहिती दिली. ''सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार नाही. रैना आणि त्याच्या कुटुंबीयांना चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण पाठींबा आहे,''असे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी सांगितले.