Abu Dhabi T10 League: सुरेश रैनापासून ते आंद्रे रसेलपर्यंत...! फायनलमध्ये सर्वच 'फेल', तरीदेखील ट्रॉफीवर केला कब्जा

टी-10 लीगमध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्स न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 03:36 PM2022-12-05T15:36:06+5:302022-12-05T15:37:28+5:30

whatsapp join usJoin us
Suresh Raina of Deccan Gladiators defeats New York Strikers in Abu Dhabi T10 League to win title for the second time  | Abu Dhabi T10 League: सुरेश रैनापासून ते आंद्रे रसेलपर्यंत...! फायनलमध्ये सर्वच 'फेल', तरीदेखील ट्रॉफीवर केला कब्जा

Abu Dhabi T10 League: सुरेश रैनापासून ते आंद्रे रसेलपर्यंत...! फायनलमध्ये सर्वच 'फेल', तरीदेखील ट्रॉफीवर केला कब्जा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सुरेश रैना (Suresh Raina) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) यांसारख्या स्टार्स खेळाडूंनी सजलेल्या डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाने अबुधाबी टी-10 लीगचे विजेतेपद पटकावले आहे. निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील संघाने अंतिम फेरीत कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखालील न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा 37 धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

तत्पुर्वी, न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने नाणेफेक जिंकून डेक्कन ग्लॅडिएटर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. डेक्कनच्या संघाचा कर्णधार पूरनच्या 40 आणि डेव्हिस वीसच्या नाबाद 43 धावांच्या जोरावर संघाने 10 षटकांत 4 गडी गमावून 128 धावा केल्या. सलामीसाठी आलेला भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना अंतिम सामन्यात काही खास करू शकला नाही. रैना केवळ 7 धावा करून तंबूत परतला, तर दुसऱ्या क्वालिफायरमध्ये अर्धशतकी खेळी खेळणाऱ्या आंद्रे रसेलच्या बॅटनेही फायनलमध्ये निराश केले. रसेल 8 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. डेक्कन ग्लॅडिएटर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करून न्यूयॉर्क स्ट्रायकर्ससमोर विजयासाठी 129 धावांचे आव्हान दिले होते. 

न्यूयॉर्क स्ट्रायकर्सने केल्या 91 धावा
न्यूयॉर्क स्ट्रायकर्सकडून फिरकीपटू अकिल हुसैनने दोन तर वहाब रियाझ आणि पोलार्डने प्रत्येकी 1-1 बळी घेतला. 129 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्ट्रायकर्स संघ 5 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 91 धावा करून गारद झाला. त्यांच्याकडून पोलार्डने 15 चेंडूत 23 धावा केल्या तर जॉर्डन थॉम्पसन 17 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. यष्टिरक्षक आझम खानने 16 धावांचे योगदान दिले. डेक्कनकडून वेगवान गोलंदाज जोशुआ लिटल आणि मोहम्मद हसनैनने प्रत्येकी दोन बळी घेतले.

निकोलस पूरनने चोपल्या 345 धावा
याआधी डेक्कन ग्लॅडिएटर्सने मागील वर्षी देखील जेतेपदावर कब्जा केला होता. सध्याच्या स्पर्धेत निकोलस पूरन सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. पूरनने लीगमध्ये 147 चेंडूंचा सामना करत तब्बल 345 धावा केल्या. यादरम्यान त्याने 234 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आणि एकूण 26 षटकार ठोकले. वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसने गोलंदाजीवर वर्चस्व राखले. प्रिटोरियसने 10 सामन्यात 12 बळी पटकावले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: Suresh Raina of Deccan Gladiators defeats New York Strikers in Abu Dhabi T10 League to win title for the second time 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.