नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात इंडियन प्रीमिअर लीग आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. खरं तर आयपीएल 2023चा हंगाम भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा विद्यमान कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी अखेरचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीएसकेच्या संघाचा पुढचा कर्णधार कोण असणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. अशातच सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैनाने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
दरम्यान, महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. याशिवाय धोनीच्या नेतृत्वात सीएसकेच्या संघाने 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएलचा किताब पटकावला आहे. मात्र धोनीनंतर सीएसकेच्या संघाची धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न सतत तोंड वर काढत आहे. रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, डेव्होड कॉन्वे हे सीएसकेचे आगामी काळातील कर्णधार असणार का असे विचारले असता रैनाने सगळ्यांना चुकीचे ठरवत इंग्लिश अष्टपैलू खेळाडूचे नाव घेतले.
रैनाने जाहीर केला CSKचा नवा कर्णधार! खरं तर आज कोची येथे आयपीएलचा मिनी लिलाव पार पडत आहे. अशातच रैनाच्या मते इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन सीएसकेचा नवा कर्णधार असू शकतो. "सीएसकेला त्यांच्या सेटअपमध्ये सॅम कुरन खरोखर हवा आहे कारण त्याने वर्ल्ड कपमध्ये खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. त्याच्याकडे उत्कृष्ट नेतृत्व गुण देखील आहेत. सीएसके भविष्यात त्याच्यामध्येच कर्णधार शोधू शकते," असे रैनाने जिओ सिनेमाशी बोलताना सांगितले. सॅम कुरनने ऑक्टोबरमध्ये पार पडलेल्या ट्वेंटी-20 विश्वचषकात शानदार खेळी केली होती. 24 वर्षीय क्रिकेटपटूला 2020 च्या लिलावात 5.5 कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आले होते, परंतु यावेळी त्याला जास्त बोली लागण्याची शक्यता आहे.
CSKने रिलीज केलेले खेळाडू - ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, ॲडम मिल्न्, हरी निशांथ, ख्रिस जॉर्डन, भगत वर्मा, केएम आसीफ, नारायण जगदीसन.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"