Suresh Raina received honorable doctorate: सुरेश रैनाची भारतातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये गणना केली जाते. आपल्या समृद्ध क्रिकेट कारकिर्दीत त्याने टीम इंडियाला अनेक सामने जिंकवून दिले आणि असंख्य शानदार खेळी खेळल्या. एक काळ असा होता की रैना म्हणजेच भारतीय संघाची मधली फळी हे समीकरण बनलं होतं. युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना या त्रिकुटामुळेच भारताने आव्हानांचा पाठलाग करण्यात मोठं यश मिळवलं आणि मोठ्या धावसंख्या देखील चेस केल्या. IPL मध्ये देखील चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी सुरेश रैना अनेक विक्रम केले. या साऱ्या गोष्टींचा बहुमान म्हणून सुरेश रैनाच्या शिरपेचात आणखी एक मानाच तुरा खोवला गेला आहे. सुरेश रैना नुकतीच मानाची डॉक्टरेट बहाल करण्यात आली.
सुरेश रैना आता फक्त सुरेश रैना राहिला नसून तो 'डॉक्टर' सुरेश रैना झाला आहे. MR. IPL सुरेश रैनाला त्याची डॉक्टरेट पदवी चेन्नईच्या वेल्स विद्यापीठातून प्राप्त झाली ३५ वर्षीय रैनाने या कार्यक्रमाचे काही फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत. 'प्रतिष्ठित वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि अॅडव्हान्स्ड स्टडीज यांच्याकडून हा सन्मान मिळाल्याबद्दल मला आनंद झाला. मी स्वत:ला भाग्यवान समजतो. श्री ईशारी गणेश जी, मी तुम्हा सर्वांच्या प्रेमाने प्रभावित झालो आहे आणि मनापासून धन्यवाद देतो. चेन्नई हे माझं घर आहे आणि माझ्या मनात चेन्नईसाठी खास जागा आहे', अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय असलेला सुरेश रैना गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटपासून दूर होता. त्यामुळेच गेल्या वर्षी २ कोटींच्या मूळ किमतीतही IPLच्या एकाही संघाने त्याला लिलावात विकत घेतले नाही. स्पर्धे दरम्यान काही संघांचे काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले आणि अनुपलब्ध पण झाले पण तरीही बदली खेळाडू म्हणून रैनाला बोलावण्यात आले नाही. त्यामुळे २०२२ च्या हंगामात सुरेश रैना कॉमेंट्री करण्यास सुरुवात केली.