भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैना क्रिकेटपासून दूर असला तरी तो विविध माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. क्रीडा विश्वातील घडामोडींवर भाष्य करताना रैना अनेकदा चाहत्यांच्या मनातील बाबी उघडपणे बोलून दाखवतो. आता त्याने टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी कोण विराजमान होईल याबद्दल भाकीत सांगितले आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे रैनाने नमूद केले. अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) हार्दिक पांड्याला वगळून भारताच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदी गिलची निवड केली.
शुबमन गिल एक सुपरस्टार आहे. तो आताच्या घडीला उपकर्णधारपद म्हणून कार्यरत आहे. तो आता उपकर्णधार आहे म्हणजेच त्याच्याबद्दल पुढचा विचार सुरू आहे. जर त्याने आगामी काळात आयपीएमध्ये चांगली कामगिरी केली आणि गुजरातच्या संघाला ट्रॉफी जिंकवून दिली तर तो अधिकच चमकेल. त्यामुळे मला वाटते की तो भारताचा पुढचा ट्वेंटी-२० कर्णधार असेल, असे सुरैश रैनाने सांगितले.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार रैना म्हणाला की, रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये आणखी चांगली कामगिरी करेल असे दिसते. दुलीप ट्रॉफीमध्ये त्याने अर्धशतक झळकावले. कसोटी सामन्यांमध्ये प्रत्येक सत्र महत्त्वाचे असते. भारत बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध चांगला खेळ करुन सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्याकडे फिरकीपटूंची चांगली फळी आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज त्यांचा कसा सामना करतात हे पाहण्याजोगे असेल.
बांगलादेशविरुद्ध भारताचा संघ -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.