मुंबई- 'चांगली कामगिरी करुनही मला भारतीय संघातून बाहेर ठेवण्यात आलं होतं. ज्यामुळे मी खूप दुखावलो होतो. पण आता मिळालेल्या संधीचं सोनं करणार आहे, असं टीम इंडियाचा फलंदाज सुरेश रैनाने म्हंटलं आहे. सुरेश रैनाने बऱ्याच काळानंतर भारताच्या टी-20 संघात पुनरागमन केलं आहे. याचबद्दल बोलताना सुरेश रैनाने हे वक्तव्य केलं आहे. आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सुरेश रैनाने हे वक्तव्य केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या आगामी टी-20 सामन्यात सुरेश रैना खेळताना दिसणार आहे.
'चांगली कामगिरी करूनही मला भारतीय संघाबाहेर ठेवण्यात आलं होतो. म्हणून मी दुःखी झालो. पण आता मी यो-यो टेस्ट पास केली आहे. त्यामुळे मी आता पूर्णपणे फिट आहे. एवढ्या महिन्यांच्या कठोर ट्रेनिंगमुळे भारतासाठी खेळण्याची माझी इच्छा आणखी प्रबळ झाली आहे', असं सुरेश रैना याने म्हंटलं.
'भारतासाठी जास्तीत-जास्त दिवस खेळावं हाच माझा प्रयत्न असणार आहे. मला 2019चा विश्वचषक खेळायचा आहे. कारण माझी इंग्लंडमधील कामगिरी चांगली होती. माझ्यामध्ये अजून बरंच क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे मला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन टी-20 मध्ये चांगली कामगिरी करायची आहे.' असंही सुरेश रैना यांनी म्हंटलं. 31 वर्षीय सुरेश रैना 223 वनडे, 65 टी-20 आणि 18 कसोटी सामने खेळला आहे.
दरम्यान एकदिवसीय सामन्यात सीरिज आपल्या नावे केल्यानंतर टीम इंडिया आज दक्षिण आफ्रिकेच्याविरोधात सहावी आणि शेवटची मॅच खेळणार आहे. सहा सामन्यांच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने 4-1 ने विजय मिळविला आहे. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या चौथ्या वनडेमध्ये भारताला पराभवाला समोरं जावं लागलं होतं. पाचव्या वनडे सामन्यात विजय मिळवून भारताने आयसीसी वनडे रँकिंगमधील दक्षिण आफ्रिकेचा पहिला क्रमांक हिसकावून घेतला आहे.