Virat Kohli Rohit Sharma: श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या ब्रेकवर आहेत. भारतीय संघाला आता १९ सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. याआधी, ५ सप्टेंबरपासून देशांतर्गत स्पर्धा दुलीप ट्रॉफीही सुरु होणार आहे. त्यामध्ये कोहली-रोहित-जसप्रीत बुमराह वगळता बहुतेक वरिष्ठ खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
रोहित-विराटने दुलीप ट्रॉफी खेळायला हवी होती!
रोहित-विराटच्या दुलीप ट्रॉफीमधून बाहेर पडण्यावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सुरेश रैनाचं वक्तव्य समोर आले आहे. या दोन्ही दिग्गजांनी दुलीप ट्रॉफी खेळायला हवी होती, असे रैनाचे मत आहे. रैनाच्या म्हणण्यानुसार, भारतीय संघाने बरेच दिवस कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. अशा परिस्थितीत खेळाडूंना लाल चेंडूने सराव करावा लागेल. बांगलादेश व्यतिरिक्त भारताला आगामी काळात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धही कसोटी सामने खेळायचे आहेत. मात्र, कुटुंबासोबत वेळ घालवणेही महत्त्वाचे असल्याचेही रैनाने सांगितले.
'कुटुंबासोबत वेळ घालवणे महत्वाचे आहे...'
रैनाने स्पोर्ट्सतकशी बोलताना सांगितले की, त्या दोघांनी खेळायले हवे होते. कारण आम्ही आयपीएलनंतर कसोटी लाल चेंडूचे क्रिकेट खेळलेले नाही. पण हल्लीचे क्रिकेट खूपच व्यस्त कार्यक्रमातील असते. त्यामुळे देशांतर्गत हंगामात तुम्ही लाल चेंडूने सराव करणे आवश्यक आहे. पण मला वाटते की खेळाडू परिपक्व आहेत आणि त्यांना खेळाडू म्हणून काय करावे हे माहित आहे. त्यामुळे काही वेळा कुटुंबासोबत वेळ घालवणेही खूप महत्त्वाचे ठरते.
दरम्यान, बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी कसोटी खेळाडूंनी किमान एक दुलीप ट्रॉफी सामना खेळावा, अशी बोर्डाची इच्छा आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये टीम-अ चे कर्णधारपद शुभमन गिलकडे, टीम-बी ची कमान अभिमन्यू ईश्वरनकडे, टीम-सी चे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आले आहे. ही दुलीप ट्रॉफी स्पर्धा ५ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे.