कोरोना व्हायरसमुळे पीयूष चावला व चेतन सकारिया यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू सुरेश रैना ( Suresh Raina) आणि त्याची पत्नी प्रियांका यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे प्रियांकाच्या आजीचे निधन झाले. प्रियांकानं सोशल मीडियावर आजीसोबतचा फोटो पोस्ट करून ही वाईट बातमी दिली.
प्रियांकानं लिहिलं की,''तिला वाचवण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले, परंतु कोरोनाविरुद्धची लढाई ती हरली. मागील १० दिवसांपासून तिच्यावर आयसोलेशनमध्ये उपचार सुरू होते आणि आमच्यापैकी कुणीच त्यांना पाहू शकत नव्हतो. मी ९ वर्षांची होती तेव्हा आजी माझ्यासोबत आली. तिच्या जाण्यानं जे दुःख झालंय, ते शब्दात व्यक्त करू शकत नाही.''
''आमच्या कुटुंबाचा ती कणा होती. त्यामुळे तिच्या नसण्याचं दुःख पचवू शकत नाही. तिला अखेरच्या क्षणीही मला पाहता आले नाही. मागील १० दिवस आमच्यासाठी वाईट स्वप्नासारखी होती,''असेही तिनं लिहिलं.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (11 मे) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 3,29,942 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,876 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,29,92,517 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,15,221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,90,27,304 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.