दुबई : संजू सॅमसनला भारताकडून संधी मिळत नाही, याचे खरोखरच आश्चर्य वाटते. १३ व्या पर्वात राजस्थान रॉयल्सकडून संजूने पहिलाच सामना गाजवला. चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांची धुलाई करत त्याने अर्धशतक झळकावले. त्याच्या या आक्रमक खेळीनंतर अनेक माजी खेळाडूंनी संजूला भारतीय संघात जागा मिळायला हवी, अशी मागणी केली. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावरही क्रिकेटप्रेमी भारतीय संघात ऋषभ पंतऐवजी संजूला संधी द्या, अशी मागणी करत आहेत. राजस्थान रॉयल्स संघाचा मेंटॉर आणि आॅस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्ननेदेखील संजूच्या कामगिरीचे कौतुक केले.
‘ यंदा संजू असाच फॉर्मात राहिला तर राजस्थानचा संघ नक्कीच आयपीएल जिंकेल आणि भविष्यात त्याला भारतीय संघात पाहायला आवडेल,’ अशी अपेक्षा शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्सच्या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलताना व्यक्त केली. चेन्नईविरुद्ध सामन्यात संजू सॅमसनने फटकेबाजी करत १९ चेंडूत अर्धशतक झळकावले. ३२ चेंडूत ७४ धावा करणाºप्तया या खेळाडूचा सामनावीर पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. याआधी दिग्गज सुनील गावसकर यांनीदेखील संजूचा समावेश वन डे आणि टी-२० संघात असायला हवा, असे मत व्यक्त केले होते. कामगिरीतील सातत्यानंतरही काही गुणी खेळाडू मोठ्या नावाआड लपले जातात, असे सांगून गावस्कर यांनी यानंतर तरी संजूच्या नावाचा विचार होईल, अशी अपेक्षा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती.संजू गुणवान खेळाडू आहे. मी याआधीही अनेकदा सांगितलेच आहे की सध्या संजू हा प्रतिभावान खेळाडूंपैकी एक आहे. त्याला भारतीय संघात आतापर्यंत जागा मिळत नाही, हे पाहून मला आश्चर्य वाटते. तो उत्तम फलंदाजी करतो, त्याचे यष्टीरक्षण चांगले आहे, तो चांगले फटके खेळतो.-शेन वॉर्न