नवी दिल्ली : सूर्यकुमार यादव याला प्रथमच कसोटी संघासाठी बोलावणे आले आहे. सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ याच्यासोबत इंग्लंडकडे तो लवकरच रवाना होईल. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या विराटच्या नेतृत्वाखालील संघाने तीन खेळाडू जखमी होऊन बाहेर पडल्यामुळे बदली खेळाडूंची मागणी केली होती.
शुभमन गिल, आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर इंग्लंड दौऱ्यावर दुखापतग्रस्त झाले होते. सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ या दोन्ही खेळाडूंच्या नावांवरून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा झाली, त्यानंतर चेतन शर्मा यांच्या निवड समितीने अंतिम निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला तीन खेळाडू पाठवण्याची मागणी केली होती, परंतु आतापर्यंत तिसऱ्या खेळाडूच्या नावाचा समावेश झालेला नाही. मीडियात जयंत यादव याचेही नाव होते, पण अद्याप दुजोरा मिळू शकला नाही.
सूर्यकुमार आणि पृथ्वी दमदार फॉर्मातसूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून हे दोन्ही खेळाडू कमालीचे फॉर्ममध्ये आहेत. सूर्यकुमार यादवने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ६२ च्या सरासरीने १२४ धावा केल्या. त्याला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळाला. पृथ्वी शॉनेही तीन सामन्यात ३५च्या सरासरीने १०५ धावा केल्या पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. आता हे दोन्ही खेळाडू इंग्लंडला रवाना होतील. हे दोन खेळाडू श्रीलंकेहून इंग्लंडला जातील, की त्यांना भारतात परतावे लागेल हे अद्याप समजू शकलेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होईल.