नवी दिल्ली: मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव हा भारताचा एबी डिव्हिलियर्स असल्याचे मत भारताचा माजी अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजनसिंग याने व्यक्त केले आहे. मुंबईला पाचव्यांदा आयपीएल जेतेपद मिळवून देण्यात सूर्यकुमारची भूमिका मोलाची ठरली. त्याने १६ सामन्यात ४० हून अधिक सरासरीने ४८० धावा ठोकल्या. तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याच्या नावाचा विचार होऊ शकला नाही.
सूर्यकुमारला संघात स्थान का देण्यात आले नाही,असा प्रश्न हरभजनने ट्विट करीत उपस्थित केला. तो म्हणाला,‘मुंबईला मॅचविनरप्रमाणे एकापाठोपाठ एक विजय मिळवून देण्यात सूर्यकुमारची भूमिका मोलाची ठरली यात शंका नाही.त्याने फलंदाजीची पूर्ण जाबाबदारी स्वीकारली होती. पहिल्या चेंडूपासून तो तुटून पडायचा.त्याला रोखणे कुणाच्याही अवाक्यात नव्हते.त्याच्या तंत्रात सर्व प्रकारचे फटके आहेत.
कधी कव्हर्सच्या वरुन तर कधी स्वीपचा फटका मारण्यात त्याचा हातखंडा पाहून तो भारताचा डिव्हिलियर्स असल्याची खात्री पटते.’ सूर्याने स्वत:च्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कामगिरीची ही त्याची पहिली वेळ नाही. मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळाल्यापासूनत्याने धावांचा धडाका केला. २०१८ ला त्याने ५१२ आणि २०१९ ला ४२४ धावा केल्या. गौतम गंभीर, टॉम मूडी आणि इयान बिशप यांनी देखटखील सूर्यकुमारच्या कामगिरीचे तोंडभरुन कौतुक केले होते, याची आठवण भज्जीने करुन दिली.