नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाच्या सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 2 अर्धशतके झळकावली आहेत. याचाच फायदा सूर्याला आयसीसीच्या क्रमवारीत झाला आहे. सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकून आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला सूर्या जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे.
सूर्या'ची ICC क्रमवारीत गरूडझेपदरम्यान, सूर्यकुमार यादव 863 गुणांसह आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. तर पाकिस्तानी संघाचा सलामीवीर मोहम्मद रिझवान 842 गुणांसह या यादीत दुसऱ्या स्थानी स्थित आहे. डेव्होन कॉनवे (792), बाबर आझम (780) आणि एडन मार्करम हे या यादीत अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. सूर्यकुमारने यादवने ICC टी-20 विश्वचषकातील त्याच्या शानदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानच्या अनुभवी मोहम्मद रिझवानला मागे टाकले. सूर्याने चालू विश्वचषकात नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतके नोंदवली आहेत.
मार्च 2021 मध्ये भारतीय संघात पदार्पण केलेल्या सूर्याने कमी वेळातच स्वत:ला सिद्ध केले. भारताच्या सूर्याने विश्वचषकाच्या आधीच यावर्षी टी-20 मध्ये आठ अर्धशतके आणि एक शानदार शतक झळकावले आहे. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्टीवर सूर्या अधिकच आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय संघ सध्या बांगलादेशविरूद्ध सामना खेळत आहे. सूर्यकुमारने या विश्वचषकातील 3 सामन्यांमध्ये एकूण 134 धावा केल्या आहेत. आजच्या सामन्यातील विजय भारतीय संघाचे उपांत्य फेरीचे तिकिट निश्चित करणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"