भारतीय टी-२० संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. नाणेफक गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघानं अभिषेक शर्माच्या रुपात पहिली विकेट लवकर गमावली. पण त्यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांची वादळी खेळीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचे खांदे पडल्याचे पाहायला मिळाले. दोघांनी पॉवर प्लेमध्ये षटकार चौकारांची आतषबाजी केली.
सूर्या भाऊनं २१ कोटींच्या गड्याला टाकलं मागे
सूर्यकुमार यादवनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात १७ चेंडूत २१ धावांची खेळी केली. पण त्याच्या या अल्प धावसंख्येच्या खेळीत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने त्याने खास टप्पा पार केला आहे. सूर्यकुमार यादव याने जेराल्ड कोएत्झीच्या गोलंदाजीवर षटकार मारत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपले स्थान आणखी भक्कम केले आहे. सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीतील निकोलस पूरनला मागे टाकले आहे. तो आता या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. निकोलस पूरन याने ९८ सामन्यात १४४ षटकार मारले आहेत.
सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल, पण सूर्यानं फक्त...
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा रोहित शर्माच्या नावे आहे. त्याने १५९ सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २०५ षटकार मारले आहेत. त्यापाठोपाठ या यादीत न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलचा नंबर लागतो. त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत १२२ सामन्यात १७३ षटकार मारले आहेत. सूर्यकुमार यादव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असला तरी सक्रीय खेळाडूंच्या यादीत तो अव्वलस्थानी आहे. फक्त ७५ टी-२० सामन्यात सूर्यानं १४५ वा षटकार आपल्या खात्यात जमा केला.