Suryakumar Yadav Reacts on Hardik Pandya : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिकेला कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावरून सुरुवात होणार आहे. २२ जानेवारीला रंगणाऱ्या पहिल्या लढती आधी भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सूर्यकुमार यादवनं भारतीय संघातील स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यासंदर्भात मोठं भाष्य केलं आहे.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
हार्दिक पांड्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा सीन
रोहित शर्मानं टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर सूर्यकुमारच्या खांद्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी आलीये. कॅप्टन्सीच्या शर्यतीत हार्दिक पांड्याचे नाव चर्चेत असताना सूर्याला मोठी जबाबादारी मिळाली. एवढेच नाही तर इंग्लंड विरुद्धच्या टी-२० संघाची घोषणा झाल्यावर हार्दिक पांड्या संघात असताना अक्षर पटेलकडे उप कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली. यासर्व गोष्टीमुळे हार्दिक पांड्या दुर्लक्षित होतोय का? असा प्रश्नही निर्माण झाला. आता कॅप्टन सूर्यकुमार यादव याने हार्दिक पांड्याची संघातील भूमिका काय त्यावर भाष्य करत आतली गोष्ट सांगितलीये.
सूर्यकुमार यादवला विचारण्यात आला पांड्यासोबतच्या बॉन्डिंगसंदर्भातील प्रश्न
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेआधी सूर्यकुमार यादव याने हार्दिक पांड्या हा संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे, असे म्हटले आहे. माझ्यावर अतिरिक्त भार असला तरी हार्दिक पांड्याही नेतृत्व गटाचा महत्त्वाचा भाग आहे, असे सूर्यकुमार यादवनं सांगितले. पत्रकारपरिषदेत सूर्यकुमार यादवला हार्दिक पांड्यासोबतच्या बॉन्डिंगसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर सूर्यकुमार यादव म्हणाला की,
हार्दिकसोबतच बॉन्डिंग खूपच भारी आहे. फक्त मला अतिरिक्त जबाबदारी मिळाली आहे. हार्दिक पांड्या लीडिंग ग्रुपचा महत्तपूर्ण भाग आहे. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत.
आयपीएलमध्ये दोन कॅप्टन्सचा कॅप्टन आहे पांड्या
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे दोघेही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतात. आयपीएलमध्ये पुन्हा एकदा भारतीय कॅप्टन हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळतानाचा सीन पाहायला मिळणार आहे. गत हंगामात रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन असताना तो आयपीएलमध्ये पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळला होता. यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा हे दोन कॅप्टन पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील.