Join us  

कांगारुंविरुद्ध सूर्याची बॅट तळपली, रोहितला मागे टाकलं; आता 'विराट' विक्रमही धोक्यात!

कर्णधार सूर्यकुमार यादवने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४२ चेंडूंत ८० धावा फटकावत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 10:42 AM

Open in App

विशाखापट्टनम : वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाने भारतीय क्रिकेट चाहत्यांना झालेलं दु:ख काहीसं कमी करत काल भारताच्या यंग ब्रिगेडने कांगारुंना चितपट केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दोन विकेट्स राखून विजय मिळवला. इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांची दमदार अर्धशतके आण शेवटी रिंकू सिंह याच्या तडाखेबंद खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने दिलेलं २०९ धावांचं आव्हान भारताने शेवटच्या षटकात गाठलं. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या सूर्याला 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब मिळाला आणि त्याने भारताचा वनडे आणि कसोटीतील कर्णधार रोहित शर्माचा एक विक्रमही मोडीत काढला आहे.

पहिल्यांदाच भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सूर्यकुमार यादवने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवख्या भारतीय संघातील गोलंदाजांची धुलाई करत ऑस्ट्रेलियाने २० षटकांत तब्बल २०८ धावा केल्या. त्यानंतर कांगारुंनी दिलेल्या २०९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. भारताचा सलामीवर ऋतुराज गायकवाडला रनआऊट झाल्याने एकही चेंडू न खेळता माघारी परतावं लागलं. त्यानंतर दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वालही वेगवान फटकेबाजी करण्याच्या नादात झेलबाद झाला. मात्र नंतर इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने भारताचा डाव सावरला. इशान किशनने ३९ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमारने ४२ चेंडूंत ८० धावा फटकावत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. नंतर रिंकू सिंह याने १४ चेंडूंत २२ धावा करत फिनिशिंग टच दिला.

रोहितला मागे टाकलं, आता निशाण्यावर 'विराट' विक्रम!

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा हा त्याच्या आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखला जातो. चौकार-षटकारांची बरसात करत रोहितने अनेकदा एकहाती सामने फिरवत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. याच जोरावर १४८ टी-ट्वेंटी सामने खेळलेला रोहित १२ वेळा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. मात्र सूर्यकुमार यादवने हा विक्रम मोडला आहे.सूर्यकुमार यादव हा मागील दोन वर्षांपासून टी-ट्वेंटीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. सूर्याने आतापर्यंत खेळलेल्या ५४ सामन्यांत १३ वेळा सामनावीर ठरण्याची किमया साधली आहे. सामनावीर पुरस्कारांमध्ये रोहितला मागे टाकल्यानंतर आता सूर्याच्या निशाण्यावर विराट कोहलीचा विक्रम असणार आहे. कारण विराटने ११५ सामन्यात १५ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

दरम्यान, टी-ट्वेंटी सामन्यात कर्णधारपदाच्या पदार्पणावेळीच सामनावीर ठरणारा सूर्यकुमार यादव  दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी जसप्रीत बुमराहने ही कामगिरी केली होती. आयर्लंडविरुद्ध झालेल्या टी-ट्वेंटी मालिकेत जसप्रीत बुमराहला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. कर्णधार असलेला जसप्रीत बुमराह पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्काराचाही मानकरी ठरला होता.  

टॅग्स :सूर्यकुमार अशोक यादवरोहित शर्माविराट कोहलीटी-20 क्रिकेट