Suryakumar Yadav Catch : ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा अप्रतिम झेल घेतला. इथूनच भारतीय संघाने विजयाकडे खऱ्या अर्थाने कूच केली. दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावांची आवश्यकता होती. डेव्हिड मिलरने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर पहिलाच चेंडू सीमारेषेपार पोहोचवलाच होता, पण तितक्यात सूर्यकुमार यादव आफ्रिकन संघासाठी काळ ठरला. सीमारेषेजवळ सूर्याने अप्रतिम झेल घेऊन भारतीय चाहत्यांना सुखद धक्का दिला. या एका झेलमुळे सामना पूर्णपणे भारताच्या बाजूने फिरला. मात्र, या झेलचा दाखला देत आफ्रिकन माध्यमांनी टीम इंडिया आणि आयसीसीवर टीका केली होती.
दरम्यान, सूर्याने घेतलेला झेल चुकीचा होता, अर्थात त्याचा पाय सीमारेषेला लागला असल्याचा दावा अनेकांनी केला. मात्र, आता त्यांच्या या टीकेला उत्तर देणारा व्हिडीओ समोर आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. यामध्ये पाहायला मिळते की, सूर्यकुमार यादव व्यवस्थितपणे झेल पूर्ण करतो आणि त्याचा तोल सीमारेषेबाहेर जाताच त्याने चेंडू हवेत फेकला. मग तो सीमारेषेच्या आत आला अन् झेल पूर्ण केला.
दरम्यान, विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने सात धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. यासह तमाम भारतीयांना जल्लोष करण्याची संधी मिळाली. २०१३ नंतर भारताने प्रथमच आयसीसीचा किताब जिंकला आहे. भारताला वन डे विश्वचषकात अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. पण, यावेळी रोहितसेनेने ट्रॉफीवर कब्जा केला. दरम्यान, २०१३ नंतर टीम इंडियाने पहिली आयसीसी ट्रॉफी उंचावताना दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत केले. संपूर्ण स्पर्धेत थंड पडलेली विराट कोहलीची बॅट फायनलमध्येच तळपली. अक्षर पटेलने मॅच विनिंग अष्टपैलू कामगिरी केली. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला.