Sanju Samson Mayank Yadav, IND vs BAN 1st T20: पाकिस्तानला पराभवाचे पाणी पाजून आलेल्या बांगलादेशी संघाला टीम इंडियाने कसोटी मालिकेत पराभूत केले. भारताने बांगलादेश विरूद्ध कसोटी मालिकेत २-० ने विजय मिळवला. आता उद्यापासून भारत ( Team India ) आणि बांगलादेश ( Bangladesh ) यांच्यात तीन सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी आज भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav ) याने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्याने संजू सॅमसन आणि मयंक यादव या दोन खेळाडूंबाबत महत्त्वाची विधाने केली. संजू सॅमसन कितव्या क्रमांकावर खेळेल, मयंक यादवला 'प्लेइंग ११'मध्ये संधी मिळणार का? या प्रश्नांची सूर्यकुमार यादवने उत्तरे दिली.
संजू सॅमसन ओपनिंग करेल!
"संजू सॅमसन टी२० मालिकेत नक्कीच खेळेल. संजू सॅमसन टी२० मालिकेत सलामीला उतरेल. तो अभिषेक शर्मा ( Abhishek Sharma )सोबत ओपनिंग बॅटिंग करेल," असे स्पष्ट शब्दांत सूर्यकुमार यादवने सांगितले. मयंक यादवबाबतही त्याने विधान केले. "मयंक यादव हा उदयोन्मुख खेळाडू आहे. त्याच्यात नक्कीच X फॅक्टर आहे. मयंक यादवसारख्या खास खेळाडूला चांगल्या पद्धतीने हाताळावे लागेल यात शंका नाही. BCCI मयंकला योग्य त्या पद्धतीने संधी देत राहिल याची मला खात्री आहे," असे सूर्यकुमार यादवने नमूद केले.
टी२० मालिकेआधी भारताला धक्का
मालिका सुरु होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला. भारताचा स्टार ऑलराऊंडर शिवम दुबे याने मालिकेतून माघार घेतली. BCCI ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे त्याला मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. भारताच्या संघनिवड समितीने शिवम दुबेच्या जागी मुंबई इंडियन्सकडून खेळणारा तिलक वर्मा याला संघात समाविष्ट केले आहे. तिलक वर्मा रविवारी सकाळी ग्वाल्हेरमध्ये येऊन संघात दाखल होईल.
भारताचा सुधारित संघ:- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव, तिलक वर्मा