नवी दिल्ली : वेस्ट इंडिजला एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेत ३-० असा व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी सज्ज होत आहे. मात्र, या मालिकेआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर झाला असून तो संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतच चहरला दुखापत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार मांडीचे स्नायू ताणले गेल्याने चहरने भारतीय संघाचे बायो-बबल सोडले आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी चहर आता बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) जाईल. येथे तो ५-६ आठवडे रिहॅबमध्ये राहील.
कोलकाता येथे विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान चहरच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. वैयक्तिक दुसऱ्या षटकातील पाचवा चेंडू टाकल्यानंतर चहरला ही दुखापत झाली. यामुळे त्याला गोलंदाजी करणे अशक्य झाले होते. त्याचवेळी त्याने मैदान सोडले होते. एनसीएमध्ये पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चहर आता थेट आयपीएलद्वारे मैदानात पुनरागमन करेल, असे म्हटले जात आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेला २४ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. मालिकेतील पहिला सामना लखनौ येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर खेळविण्यात येणार असून २१ फेब्रुवारीलाच भारतीय संघ कोलकाता येथून लखनौला पोहचला आहे. मंगळवारी झालेल्या सराव सत्रादरम्यान भारतीय खेळाडूंनी चांगलाच घाम गाळला. या मालिकेसाठी विराट कोहली, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली असून जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन होत आहे. जडेजाने सुमारे तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भारतीय संघात पुनरागमन केले आहे. पंतच्या अनुपस्थितीत इशान किशन यष्टिरक्षण करणार असून अतिरिक्त यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसनचीही संघात निवड झाली आहे.
Web Title: Suryakumar Yadav Deepak Chahar ruled out of Sri Lanka T20Is
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.