२०२२ वर्षात ट्वेंटी-२० क्रिकेट गाजवणाऱ्या सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) रणजी करंडक स्पर्धेत मंगळवारी वादळ आणले... मुंबईच्या BKC मैदानावर हैदराबादच्या गोलंदाजांनी सूर्यकुमारने चांगलीच धुलाई केली. तो आज आणखी एक शतक झळकावेल असेच चिन्ह होती, परंतु लंच ब्रेकनंतर त्याच्या आजच्या खेळाला हैदराबादच्या गोलंदाजांनी पूर्णविराम लावला.
भारताकडून १६ वन डे व ४२ ट्वेंटी-२० सामन्यांत दमदार कामगिरी करणाऱ्या सूर्याच्या नावावर वन डेत ३८४, तर ट्वेंटी-२०त १४०८ धावा आहेत. ट्वेंटी-२० त त्याने २ शतकं झळकावली आहेत आणि कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारा तो पहिला भारतीय व जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. सूर्याने हाच फॉर्म रणजी करंडक स्पर्धेत कायम राखला. मुंबईचे प्रतिनिधित्व करताना आज त्याने वादळी खेळी केली.
पृथ्वी शॉ २१ चेंडूंत १९ धावांवर माघारी परतल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांनी तुफान फटकेबाजी केली. सूर्याने खास वन डे स्टाईल फलंदाजी करताना यशस्वीसह १५३ धावांची भागीदारी केली. लंच ब्रेकनंतर हैदराबादचा गोलंदाज शशांक एमला सूर्याची विकेट मिळवण्यात यश आले. सूर्या ८० चेंडूंत ९० धावा करून माघारी परतला. त्याच्या या खेळीत १५ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. यशस्वी १०९ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारासह ६९ धावांवर खेलतोय आणि मुंबईने ३८ षटकांत २ बाद १९३ धावा केल्या आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"