IND vs WI ODI, Suryakumar Yadav: भारताविरूद्ध वेस्ट इंडिजला पहिल्या वन डे सामन्यात मोठ्या फरकाने पराभूत व्हावं लागलं. रोहित शर्माच्या टीम इंडियापुढे कायरन पोलार्डच्या वेस्ट इंडिजचा निभाव लागला नाही. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २८ षटकं खेळून १७८ धावा केल्या. जेसन होल्डरने एकमेव अर्धशतक झळकावलं. त्याला अँलनने (२९) थोडी साथ दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्माने ६० धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तर सूर्यकुमारने शेवटपर्यंत नाबाद राहत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
सूर्यकुमारने बऱ्याच सामन्यात शेवटपर्यंत नाबाद राहत संघाचा डाव सांभाळला आहे आणि संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे त्याची तुलना ऑस्ट्रेलियाचा फिनिशर मायकल बेवन याच्याशी केली जाते. याचबद्दल त्याला पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर सूर्याने मजेशीर उत्तर दिलं. "सर, मला सूर्यकुमार यादवच राहू दे. मी अजूनपर्यंत भारतासाठी ५-७ सामनेच खेळलो आहे. मी खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला ज्या क्रमांकावर फलंदाजी करायला मिळते त्या क्रमांकावर मी खेळतो. त्या परिस्थितीत संघाला विजय कसा मिळवून देता येईल हाच माझा प्रयत्न असतो. भारताची पहिली फलंदाजी असेल तरीही मी तसंच खेळेन. मी गोलंदाजाला माझ्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही", असं सूर्या म्हणाला.
"फलंदाजी करताना आम्ही फार विचार करत नाही. गेल्या सामन्यात आम्ही जशी फलंदाजी केली तशीच कामगिरी पुढेही करत राहायची असा आमचा विचार आहे. जेव्हा आम्ही प्रथम फलंदाजी करतो त्यावेळी आमचा प्रयत्न असतो की शेवटपर्यंत फलंदाजी करायची आणि संघाला आव्हानात्मक लक्ष्य गाठून द्यायचं. दुसऱ्या डावात फलंदाजी करतानादेखील आमचा विचार तसाच असतो. आव्हानाचा पाठलाग करताना शेवटपर्यंत तळ ठोकून मैदानात उभं राहायचं आणि संघाला विजय मिळवून द्यायचा", असं सूर्यकुमारने स्पष्ट केलं.