भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार क्रिकेटर देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप करंडक स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. बांगलादेश विरुद्धच्या मालिकेआधी अनेक खेळाडूंसाठी ही एक अग्नीपरीक्षा असेल. कारण या स्पर्धेत धमक दाखवण्यास जर एखादा खेळाडू कमी पडला तर त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद होऊ शकतात. दमदार कामगिरीसह टीम इंडियातील दावेदारी भक्कम करण्यासाठी या स्पर्धेत काही खेळाडूंमध्ये मोठी स्पर्धाही दिसेल.
या ७ खेळाडूंवर असतील नजरा
दुलीप करंडक स्पर्धेत प्रामुख्याने ७ खेळाडूंवर अधिक फोकस असेल. यातील काहीजण टीम इंडियात कमबॅकसाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे काहींवर आपल्यातील सातत्य कायम असल्याचे सिद्ध करून टीम इंडियात स्थान टिकवण्याचे आव्हान असेल. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि ईशान किशन हे ते प्रमुख खेळाडू आहेत. जे आगामी स्पर्धेमुळे चर्चेत आहेत.
पंतची कसोटी; त्याला या मंडळींकडून मिळू शकते तगडी फाईट
रिषभ पंत याने टी-२० क्रिकेटमध्ये कमबॅक करून दाखवलं आहे. पण मोठ्या अपघातून सावरल्यानंतर कसोटीत स्वत:ला फिट असल्याचे दाखवून देण्यासाठी त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला फिटनेसचा दर्जा सर्वोत्तम असल्याचे सिद्ध करावे लागेल. पंतला लोकेश राहुल आणि ईशान किशन ही मंडळी तगडी फाईट देऊ शकतात.
सूर्यकुमारची डाळ शिजणार का?
सूर्यकुमार यादव हा टी-२० संघाचा नवा कॅप्टन झाला आहे. एका बाजूला त्याचे प्रमोशन झाल्याचा सीन दिसत असला तरी दुसऱ्या बाजूला वनडे आणि कसोटी संघातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळण्याची उत्सुकताही त्याने बोलून दाखवली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये जलवा दाखवून त्याची डाळ शिजणार का? तेही पाहण्याजोगे असेल.
या मंडळींचं स्थान जवळपास पक्कं, पण....
शुभमन गिलचं भारतीय संघातील स्थान जवळपास पक्के आहे. पण तरीही त्याला गाफिल राहून चालणार नाही. सलामीवीरांमध्येही टीम इंडियात सध्या तगडी स्पर्धा आहे. त्यामुळे इतर खेळाडूंच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी करून तो संघातील स्थान डळमळीत होणार नाही, यासाठी प्रयत्नशील असेल. याशिवाय अष्टपैलू रविंद्र जडेजासंदर्भातही हाच सीन आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर जड्डूनं छोट्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता कसोटी आणि वनडे संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.त्याचे टीम इंडियातील स्थान सध्यातरी सेफ आहे.