ICC Men's T20I Batter Rankings - भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाचा त्याला आयसीसी ट्वेंटी-२० फलंदाजाच्या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे आणि त्याने अव्वल क्रमांकावरील पकड अधिक मजबूत केली. सूर्यकुमारने कालच्या लढतीत ३६ चेंडूंत ५६ धावांची खेळी केली, परंतु भारताला हार मानावी लागली. पण, या खेळीमुळे सूर्यकुमारच्या खात्यात १० रेटींग पॉईंट जमा झाले.
भारतीय फलंदाजाचे आता ८६५ रेटींग पॉईंट झाले आहेत आणि त्याला मागे टाकणे आता अन्य फलंदाजांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मोहम्मद रिझवानचे रेटींग पॉईंट हे ७८७ आहेत, तर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम ७५८ रेटींग पॉईंटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ ला आता सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर सूर्यकुमारने नंबर वन स्थान पटकावले होते आणि पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कप पर्यंत तो या स्थानावर कायम राहण्याची शक्यता बळावली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा रिझा हेंड्रीक्स ज्याने कालच्या सामन्यात ४९ धावांची खेळी केली तो एक स्थान वर सरकून आठव्या क्रमांकावर आला आहे. तिलक वर्मानेही १० स्थानांच्या सुधारणेसह ५५वा आणि रिंकू सिंगने ४६ स्थानांच्या सुधारणेसह ५९ वा क्रमांक पटकावला आहे.
ट्वेंटी-२० गोलंदाजांमध्ये नव्याने नंबर १ बनलेल्या रवी बिश्नोईला काल भारतीय संघात संधी मिळाली नाही आणि अफगाणिस्तानचा राशिद खान व त्याचे रेटींग पॉईंट्स ( ६९२) बरोबरीचे झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या तब्रेझ शम्सीने दोन स्थानांच्या सुधारणेसह १०वा क्रमांक पटकावला आहे. भारताचा कुलदीप यादव ५ स्थान वर सरकून ३२व्या क्रमांकावर आला आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये एडन मार्करम दुसऱ्या क्रमांकावर आला आहे आणि त्याने हार्दिक पांड्याला मागे टाकले आहे.