Suryakumar Yadav, Pakistan: भारतीय संघाने टी२० मालिकेत श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला. मालिका बरोबरीत असताना भारताच्या सू्र्यकुमार यादवने दणदणीत शतक ठोकले. सूर्यकुमार यादव जेव्हा मैदानात आला तेव्हा पॉवरप्ले संपला होता. त्यामुळे सावधपणे डाव पुढे नेण्याची भारताची भूमिका होती. पण सूर्यकुमारने मात्र खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि मग जोरदार धुलाई सुरू केली. सगळ रेषेतील फटके तर त्याने मारलेच पण त्यासोबतच लॅप शॉट मारून त्याने वेगवान गोलंदाजांची सारी हवाच काढून टाकली. चेंडू थोडा जरी अंगावर आला तरी सूर्यकुमार यादव त्या चेंडूला सीमापार पोहोचवत होता. सूर्यकुमारच्या या अजब गजब फलंदाजीचे थेट पाकिस्तानातून कौतुक करण्यात आले आहे. सूर्यापुढे एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल सारखे दिग्गजही फिके पडतात, असे पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria) ने म्हटले आहे.
Video: अजब गजब सिक्स! सूर्यकुमार यादव जमिनीवर पडला पण तरीही मारला सणसणीत षटकार
सूर्यकुमार यादव हा खऱ्या अर्थाने नवा युनिव्हर्स बॉस आहे. सूर्यकुमार यादवच्या बद्दल आता वेगळं काय बोलायचंय. मी आधीच बोललो आहे की सूर्यकुमार यादवसारखा खेळाडू आयुष्यात एखादाच असतो. आणि तो सारखा सारखा पाहायला मिळत नाही. श्रीलंकेविरूद्ध ५१ चेंडूत ११२ धावांची जी खेळी त्याने खेळली, त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. तुम्ही एबी डीव्हिलियर्स आणि ख्रिस गेलबद्दल नक्कीच चर्चा करा, पण सूर्यापुढे हे दोघेही फिके पडतात. या दोघांना त्याने कधीच झाकून टाकलं आहे. त्याने टी२० क्रिकेट वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवलं आहे," असे दानिश म्हणाला.
IND vs SL: टीम इंडियाकडून 'लंकादहन'; या Top 5 शिलेदारांमुळे साकारला मालिका विजय
भारताने असा जिंकला सामना
भारताचा इशान किशन पहिल्याच षटकात बाद झाला. त्यानंतर राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत तुफानी ३५ धावा केल्या. तो बाद झाला आणि सूर्यकुमार यादव डावाचा ताबा घेतला. शुबमन गिल ४४ धावा काढून माघारी गेला. कर्णधार हार्दिक पांड्या (४) आणि दीपक हु़ड्डाही (४) स्वस्तात बाद झाले. पण अक्षर पटेलने सूर्यकुमारला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने ७ चौकार आणि ९ षटकारांच्या साथीने नाबाद ११२ धावा चोपल्या. अक्षर पटेलनेही ९ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद २१ धावा करत संघाला २२८ धावांपर्यंत पोहोचवले.
२२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. पाथुम निसांका १५ धावांवर बाद झाला. कुसल मेंडिस देखील २३ धावा काढून माघारी परतला. या दोघांच्या बाद होण्यानंतर श्रीलंकेच्या डावाला गळती लागली. अविष्का फर्नांडो १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर धनंजय डिसिल्वा २२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर चरिथ असालांका बाद झाला. श्रीलंकेला सावरता न आल्याने भारताला ९१ धावांनी दणदणीत विजय मिळवता आला.