Join us  

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतून केदार जाधवची उचलबांगडी? मुंबईच्या खेळाडूची लागणार वर्णी

भारतीय संघ पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे आणि या मालिकेतून केदारला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 2:38 PM

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा व निर्णायक सामना चुरशीचा झाला. टीम इंडियाच्या तुलनेनं कागदावर कमकुवत दिसणाऱ्या वेस्ट इंडिज संघांन चांगली लढत दिली. कटक येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजनं 5 बाद 315 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतानं 48.4 षटकांत 6 बाद 316 धावा करून विजय मिळवला. या विजयासह भारतानं मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात संघाला गरज असताना केदार जाधवला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याला मैदानावर कर्णधार विराट कोहलीच्या रोषाचाही सामना करावा लागला.

भारतीय संघ 14 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानावर उतरणार आहे. घरच्या मैदानावर होणाऱ्या या मालिकेत टीम इंडियात काही बदल अपेक्षित आहे. केदारच्या जागी संघात मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादव याला संधी मिळण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारनं इंडियन प्रीमिअर लीग आणि स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तसेच सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेतही त्याची बॅट चांगलीच तळपली आहे. त्यामुळे निवड समितीला त्याची दखल घेणे भाग पडले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार सूर्यकुमारला संघात स्थान देण्यासाठी केदारला डच्चू मिळू शकतो. ''सूर्यकुमार यादव 7व्या क्रमांकावर फलंदाजीला आला, तर टीम इंडियाची फलंदाजाची फळी अजून मजबूह होईल. फक्त मनिष पांडे आणि सूर्यकुमार यादव हे गोलंदाज करू शकत नाही, तर केदार अष्टपैलू खेळाडू आहे.'' असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

वेस्ट इंडिजच्या मालिकेत जाधवला वन डे संघात स्थान मिळाल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याला या मालिकेत 65 धावाच करता आल्या. 34 वर्षीय केदारला दुखापतीमुळेही अनेकदा त्रास झाला आहे. त्यामुळे मधल्या फळीतील फलंदाज म्हणून त्याचा भविष्यात फार काळ विचार होण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे सूर्यकुमार हा 29 वर्षांचा आहे आणि त्याचा फॉर्म बोलका आहे. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20त त्यानं 11 सामन्यांत 56च्या सरासरीनं 392 धावा केल्या आहेत. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 70 सामन्यांत 43.53च्या सरासरीनं 4920 धावा केल्या आहेत. 149 ट्वेंटी-20त सूर्यकुमारनं 3012 धावा केल्या आहेत. 

ऑस्ट्रेलियाचा संघ - अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), सीन अ‍ॅबोट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुश्चॅग्ने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

वन डे मालिकेचे वेळापत्रक 14 जानेवारी - मुंबई17 जानेवारी - राजकोट19 जानेवारी - बंगळुरू 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजकेदार जाधवभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया