ICC Award 2023 (Marathi News) : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने २०२३च्या पुरस्कारासाठीचे नामांकनं आज जाहीर केली. भारताचा सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हा वर्षातील सर्वोत्तम ट्वेंटी-२०तील क्रिकेटपटूच्या, तर यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal ) हा इमंर्जिंग क्रिकेटपटूच्या शर्यतीत आहे. या भारतीय क्रिकेटपटूंसमोर पुरस्कारासाठी तगडे स्पर्धक आहेत.
सूर्यकुमारने २०२३ मध्ये ट्वेंटी-२०त १७ इनिंग्जमध्ये ४८.८६ च्या सरासरीने व १५५.९५च्या स्ट्राईक रेटने ७३३ धावा केल्या आहेत. २०२२ प्रमाणे सूर्याने मागील वर्षही गाजवले. २०२३च्या सुरुवातीच्या पहिल्या सामन्यात त्याला श्रीलंकेविरुद्ध केवळ ७ धावा करता आल्या होत्या, परंतु त्यानंतर त्याने पुढील २ सामन्यांत अनुक्रमे ५१ ( ३६) व नाबाद ११२ ( ५१) अशी खेळी केली. त्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ४४ चेंडूंत ८३ धावा कुटल्या आणि विंडीज दौऱ्यावरील शेवटच्या लढतीत ४५ चेंडूंत ६१ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघ त्याच्या नेतृत्वाखाली खेळला आणि मालिका जिंकली. सूर्याची ४२ चेंडूंतील ८० धावांची खेळी स्फोटक ठरली. वर्षाच्या शेवटी आफ्रिकेविरुद्ध त्याने ५७ धावांत शतक ठोकले.