Sarfaraz Khan: भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (१५ फेब्रुवारी) राजकोटमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याद्वारे सरफराज खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्या हस्ते सरफराजला पदार्पणाची कॅप देण्यात आली. सरफराजचे वडील नौशाद आणि पत्नी रोमाना जहूरही मैदानात उपस्थित होते. सरफराजला पदार्पणाची कॅप मिळताच त्याची पत्नी भावूक झाली. यावर सरफराजने प्रेमाने पत्नीचे अश्रू पुसले. यावेळी सर्फराजच्या वडिलांनी एक महत्वाची माहिती देखील दिली.
मी आज माझ्या मुलाचा सामना पाहण्यासाठी मैदानात येणार नव्हतो. मात्र भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने मला मैदानात जाण्यास सांगितले, असा खुलासा सर्फराजच्या वडिलांनी केला. सर्फराजचे वडिल म्हणाले की, माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी कालपर्यंत येण्याचा निर्णय घेतला नव्हता. अशा अवस्थेत मला सूर्याचा निरोप आला की, तुम्ही जात आहात का? तेव्हा मी सूर्याला म्हणालो की, हे बघ सूर्या, मला पाहून तो भावूक व्हावा असे मला वाटत नाही, कारण तो माझ्यावर खूप प्रेम करतो.
मला आशा होती की त्याला टेस्ट कॅप मिळेल. पण मला शंभर टक्के खात्री नव्हती, असं सर्फराजच्या वडिलांनी सांगितले. अशा परिस्थितीत सूर्याने मला समजावून सांगितले की, तुझ्या आयुष्यात हा क्षण पुन्हा येणार नाही. मी माझ्या आई-वडिलांनाही माझ्या पदार्पणासाठी घेऊन गेलो होतो. सूर्याने मला खूप छान समजावलं. मला सरफराजच्या आईनेही इथे पोहोचवायचे होते, पण मला राजकोटच्या फ्लाइटचे एकच तिकीट मिळाले आणि त्यानंतर मी आलो, असं सर्फराजच्या वडिलांनी सांगितले.
सर्फराजने ४८ चेंडूत झळकावले अर्धशतक-
राजकोट कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ५ गडी गमावून ३२६ धावा केल्या होत्या. सरफराज खानने पदार्पणाच्या कसोटी डावात ४८ चेंडूत स्फोटक अर्धशतक केले. सर्फराजने ६६ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने एक षटकार आणि ९ चौकार मारले.