Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2024 MI vs RCB: मुंबई इंडियन्सच्या संघाने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या गुरुवारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सात गडी आणि २७ चेंडू राखून पराभव केला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) पाच बळींच्या जोरावर मुंबई इंडियन्सने बंगळुरूला २० षटकात १९६ धावांवर रोखले. बंगळूरूकडून कर्णधार फाफ डु प्लेसीस, दिनेश कार्तिक आणि रजत पाटीदार यांनी अर्धशतके ठोकली. आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाकडून ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके ठोकत संघाला सहज विजय मिळवून दिला. सामन्यात सूर्यकुमार यादव हा गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून मैदानात उतरला. त्याने १९ चेंडूत ५२ धावा कुटल्या. पण स्वतः सूर्यकुमारदेखील एका गोलंदाजाला खेळायला घाबरतो असे त्याने स्वतःच कबूल केले.
सूर्या हा T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असला तरीही तोदेखील एका गोलंदाजाचा सामना करण्यासाठी घाबरतो, असे त्यानेच मुलाखती दरम्यान सांगितले. सूर्यकुमार यादव म्हणाला, "नेट्स मध्ये खेळताना आम्ही फलंदाज जसप्रीत बुमराहचा सामना करण्यासाठी पुढे जात नाही. त्याची गोलंदाजी इतकी धारदार आणि भेदक असते की तो कधी माझी बॅट तोडून टाकतो, तर कधी माझ्या पायाला दुखापत करतो. त्याच्यासमोर खेळणं हे एखादा डोंगर चढण्याइतकंच कठीण आहे. त्यामुळे मी गेल्या दोन-तीन वर्षात नेट्स मध्ये तरी त्याच्यासमोर फलंदाजीला येतच नाही. जर एखादा सीनियर खेळाडू फलंदाजी करत असताना बुमराह गोलंदाजीला आला तर तो फलंदाज दोन-तीन चेंडू खेळून स्वतःहूनच पीच सोडतो आणि दुसऱ्या खेळाडूला तेथे खेळायची संधी देतो आणि स्वतःचा बचाव करतो," असा मोठा मजेदार किस्सा सूर्यकुमारने सांगितला.
आपल्या खेळीबद्दल बोलताना सूर्या म्हणाला, "जे शॉट्स मी खेळतो त्याचा मी आधीच अभ्यास केलेला असतो. नेट्स मध्ये खेळताना मी या शॉट्स चा सराव करून ठेवलेला असतो. त्यामुळे मैदानात उतरल्यानंतर सामन्याची गरज काय आहे, त्यानुसार मी माझ्या फलंदाजीचा वेग कमी जास्त करतो. मी जेव्हा फलंदाजी करण्यासाठी जातो, तेव्हा मी कायमच माझ्या स्वतःच्या हातात सामन्याचे नियंत्रण कसे येईल यावर लक्ष देत असतो. बहुतांश वेळा मी या गोष्टीत सफल ठरतो. पण जेव्हा मी असे करण्यास असमर्थ ठरतो, त्यावेळी मी स्वतःला समजावतो की या वेळेस हे शक्य झाले नसले तरी पुढल्या वेळी आपण पुन्हा नव्याने प्रयत्न करू शकतो."
Web Title: Suryakumar Yadav praises Jasprit Bumrah says his toe crusher yorker are dangerous Mumbai Indians IPL 2024 MI vs RCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.