IND vs SA Final: भारतीय संघाने शनिवारी बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत टी-२० विश्वषकावर आपलं नाव कोरल आहे. भारताचा धमाकेदार फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. डेव्हिड मिलरला बाद करण्यासाठी सूर्याने बाऊंड्री लाईनजवळ एक जबरदस्त झेल घेतला आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गजांकडून सू्र्यकुमारच्या या कॅचचे जोरदार कौतुक होत आहे. सूर्यकुमारच्या या ऐतिहासिक कॅचनंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यासोबत त्याने महत्त्वाची घोषणा देखील केली आहे.
सूर्यकुमार यादव हा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फलंदाजीत चमकदार कामगिरी करू शकला नसला तरी त्याच्या एका झेलने भारताला मोठं जीवनदान दिलं. सूर्यकुमार यादवने टी-२० विश्वचषक स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावली आणि अनेक सामन्यांमध्ये संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. शेवटच्या सामन्यातही त्याने भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरच्या कॅचबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावेळी कॅच नाही तर विश्वचषकाची ट्रॉफी सीमारेषेच्या बाहेर जात असल्याचे वाटत होते, असे सूर्यकुमार यादवने म्हटलं आहे.
'स्पोर्ट्स टुडे'शी बोलताना सूर्यकुमार यादव डेव्हिड मिलरच्या झेलबद्दल प्रतिक्रिया दिली. "आता हे सांगणे सोपे आहे, पण त्यावेळी ट्रॉफी सीमारेषा ओलांडून दुसऱ्या कोणाकडे जाईल असे वाटत होते. पण त्यावेळी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल की षटकार लागेल याचा विचार कोणी करत नाही. माझ्या हातात जे होते ते मी करण्याचा प्रयत्न केला. त्यात वाऱ्याचाही हातभार लागला. आम्ही क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासोबत यासाठी खूप सराव केला होता आणि असे अनेक झेल घेतले," असे सूर्यकुमार यादवने म्हटलं.
सूर्यकुमार यादव सांगितले तो लवकरच टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी आपल्या शरीरावर गोंदवून घेणार आहे. “सध्या मी तारीख आणि ट्रॉफीचा टॅटू काढणार आहे. मी याआधी गेल्या वर्षी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातही हे करण्याची प्लॅनिंग केली होती. पण ते होऊ शकले नाही. यावेळी आम्ही रेषा ओलांडली आहे. हा दिवस दीर्घकाळ स्मरणात राहील. ते माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे म्हणून मी ट्रॉफी माझ्या जवळ ठेवणार हे. जेव्हा कधी टॅटू काढेल तेव्हा मी सांगेन,” असेही सूर्यकुमार यादव म्हणाला.