Suryakumar Yadav on sledging with Virat Kohli : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा त्याच्या आक्रमकतेमुळे ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय सामना असो किंवा आयपीएल विराटच्या आक्रमकतेचा अनेकांना सामना करावा लागला आहे. मग ती आक्रमकता त्याच्या फलंदाजीतून असो किंवा त्याच्या वागण्यातून... २०२०च्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व मुंबई इंडियन्स ( RCB vs MI) यांच्यातील महत्त्वाचा सामना विराटचा हाच अग्रेसिव्हनेस चर्चेत आला होता. विराट कोहली विरुद्ध सूर्यकुमार यादव असा तो संघर्ष पाहायला मिळालेला आणि या दोघांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त गाजला होता. या दोघांनी एकमेकांना जबरदस्त ठसन दिली होती आणि तेव्हा सूर्यकुमारच्या मनात नेमकं काय चाललेलं हे आता समोर आलं आहे. Breakfast with Champions या कार्यक्रमात सूर्यकुमारने त्या प्रसंगाचा संपूर्ण किस्सा सांगितला.
सूर्यकुमार यादव म्हणाला,''विराट कोहलीची एक स्वतःची स्टाईल आहे, त्याचे एनर्जी लेव्हल हा वेगळ्याच स्थरावर असतो. तो सामना मुंबई व बंगळुरू दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता. त्यामुळे तो स्लेजिंग करत होता. पण, मी माझं लक्ष विचलित होऊ दिलं नाही आणि काहीही करून जिंकायचे आहे, हे मनाशी पक्कं करून खेळलो. त्याच्याकडे चेंडू गेला तेव्हा तो माझ्याजवळ आला आणि माझ्याकडे रोखून पाहत होता. मी च्विंगम खात होतो, परंतु आतून मी खूप घाबरलो होतो. हृदयाचे ठोकेही एकदम जलद पळत होते. मी त्याला काहीच प्रत्युत्तर दिले नाही.''