ICC Champions Trophy 2025 : मिनी वर्ल्ड कप अर्थात पाकिस्तानात नियोजित असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सध्याच्या घडीला सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसीच्या या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले आहे. पण या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जायला तयार नाही. बीसीसीआयनं यासंदर्भात आयसीसीसमोर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासह पाकिस्तानी चाहत्यांचीही भारतीय संघाने या स्पर्धेसाठी पाकिस्तानात खेळायला राजी व्हावे, अशीच इच्छा असल्याचे दिसते. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मुद्यावरुन भारत-पाक क्रिकेट बोर्डातील वातावरण तापलं असताना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाच्या टी-२० कॅप्टनला पाकिस्तानी चाहत्याने ICC Champions Trophy स्पर्धेसंदर्भात प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळाले.
पाक चाहत्याकडून सूर्याला बाउन्सर अन्..
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना सेंच्युरीयनच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी भारतीय टी-२० संघाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवसह संघातील अन्य खेळाडू भटंकतीचा आनंद घेताना दिसले. यावेळी काही पाकिस्तानी चाहत्यांनी टीम इंडियातील खेळाडूंसोबत फोटो काढल्याचा सीन पाहायला मिळाला. यावेळी एका पाकिस्तानी चाहत्याने सूर्यकुमार यादवला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी तुम्ही पाकिस्तानात का यायला का तयार होत नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर सूर्यकुमार यादवनं अगदी थोडक्यात रिप्लाय दिला.
भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारानं असा दिला रिप्लाय
सूर्यकुमार यादवला जो प्रश्न विचारण्यात आला होता तो एक कडक बाउन्सरच होता. पण भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारानं त्याचा सामनाही अगदी सुरेख अन् उत्तमरित्या केला. ते आमच्या हातात नाही, असे उत्तर देत सूर्यकुमार यादवनं पाकमध्ये खेळण्यासंदर्भातील प्रश्नाला पूर्ण विराम दिला. भारतीय संघानं पाकिस्तानात खेळावं की, नाही याचं उत्तर कोणत्याही खेळाडूकडे नाही. बीसीसीआय जो निर्णय घेईल तो ते फॉल करतात. बीसीसीआयनं चेंडू भारत सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. तिथूनं हिरवा कंदील दिला जात नाही तोपर्यंत भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळणार नाही, हे अगदी स्पष्ट आहे. सूर्यानं हीच गोष्ट अगदी मोजक्या शब्दांत सांगितल्याचे पाहायला मिळाले.