Suryakumar Yadav on Axar Patel, IND vs AUS 3rd T20 : भारतीय संघाने टी२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले. मंगळवारी भारताला तिसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी होती. शेवटच्या षटकात २३ धावांची आवश्यकता असताना, ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने फटकेबाजी केली आणि सामना जिंकवला. डावाच्या शेवटच्या दोन षटकात सूर्यकुमारने अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांना गोलंदाजी दिली. पण दोघांनाही भरपूर चोप पडला. त्यामुळेच भारताला हातातला सामना गमवावा. याबद्दल सूर्यकुमारने सामन्यानंतर आपले मत मांडले. त्यासोबतच त्याने, आपल्या संघातील खेळाडूंना प्रचंड अभिमान वाटत असल्याचेही म्हटले. जाणून घ्या, पराभवानंतरही सूर्या असं का म्हणाला असेल...
"मॅक्सवेल जेव्हा मैदानात आला तेव्हा आमच्या डोळ्यासमोर एकच लक्ष्य होतं, त्याला लवकरात लवकर बाद करणं. आमचा तो प्लॅन होता, पण तो फसला. मैदानात रात्रीच्या वेळी दव पडल्याने २२२ धावांच्या लक्ष्याचा बचाव करणे कठीण होत होते. चेंडूवरील पकड हवी तशी राहत नसल्याने काही वेळा चेंडू फसतात. कालही तशीच काहीशी परिस्थिती आली. आम्ही त्यांच्या काही विकेट्स झटपट काढल्या. ड्रिंक्स ब्रेक मध्ये मी बॉलर्सना सांगितलं की मॅक्सवेलला लवकर आऊट करा, पण तो वेडेपणा ठरला. त्याने धुलाई केली आणि सारा प्लॅन फसला.
अक्षर पटेलला १९वे षटक का दिले?
अक्षर पटेलला मी १९वे षटक टाकायला दिले कारण त्याने याआधीही १९वे आणि २०वे षटक टाकले आहे. तो अतिशय अनुभवी खेळाडू आहे. मला कायम असे वाटते की महत्त्वाचे षटक अनुभवी माणसाने टाकले पाहिजे. तो स्पिनर असला तरीही माझे हेच मत असते की त्याच्या अनुभवामुळे त्याला संधी दिली जायला हवी. दव पडत असताना स्पिनरला संधी देणे कधीकधी फायद्याचे ठरते. तोच माझा विचार होता", असे सूर्यकुमार यादव म्हणाला.
मला माझ्या संघातील खेळाडूंचा अभिमान
"ऋतुराज गायकवाडने दमदार कामगिरी केली. त्याने मी बाद झाल्यावर सामना चांगला खिळवून ठेवला. फ्रँचायजी क्रिकेटमध्ये तो कायमच स्पेशल खेळाडू म्हणून अधोरेखित झाला आहे. या सामन्यातही त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली ते सर्वोत्तम होते. मला माझ्या संघातील खेळाडूंचा अभिमान आहे," अशा शब्दात त्याने साऱ्यांचे कौतुक केले.