इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या ( IPL 2024) हंगामात दमदार कामगिरी करून सर्व खेळाडू आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आपले स्थान पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतीय संघाची निवड समितीही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहे. रिषभ पंत ( Rishabh Pant) अपघातातून परतला आहे आणि त्याने सलग दोन अर्धशतकं झळकावून वर्ल्ड कपसाठीची दावेदारी सांगितली आहे. सूर्यकुमार यादवही दुखापतीतून सावरून रविवारी मुंबई इंडियन्ससाठी खेळणार आहे. ही दोघं वर्ल्ड कप संघात निश्चित मानली जात आहेत, परंतु भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) याने मोठे वक्तव्य केले आहे.
वीरेंद्र सेहवागच्या मते चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे ( Shivam Dube) पंत व सूर्यकुमार यांना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा देत आहे. क्रिकबझशी बोलताना सेहवाग म्हणाला, ''ज्या प्रकारे शिवम दुबे IPL 2024 मध्ये खेळत आहे, ते पाहता तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय संघात असायला हवा. दुबेने आता अनेक खेळाडूंवर दबाव आणला आहे आणि या शर्यतीत श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव किंवा मधल्या फळीतील फलंदाज रिषभ पंत आहे. उर्वरित खेळाडूंना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचे असेल, तर त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. माझ्या मते शिवम दुबेच्या पुढे जाण्याचा हा एकमेव मार्ग आहे.''
भारताचा माजी स्टार फलंदाज युवराज सिंगने ट्विट केले की, ''शिवम दुबेला मैदानाबाहेर सहज चेंडू मारताना पाहण्यात मला मजा येत आहे. तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये असला पाहिजे आणि गेम चेंजर होण्याची शक्ती त्याच्यात आहे.''