Suryakumar Yadav ruled out of IPL 2022 - इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मधील मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. आयपीएलच्या एका पर्वात प्रथमच मुंबईने ९ लढती गमावल्या. आता उर्वरित तीन सामन्यांत विजय मिळवून स्पर्धेचा निरोप गोड करण्याचा MIचा प्रयत्न आहे. पण, त्यांना आणखी एक धक्का बसलाय.. मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव याने आयपीएल २०२२मधून माघार घेतली आहे. ६ मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या लढतीत सूर्यकुमारच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर काल झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत तो खेळला नाही. या सामन्याआधीच त्याने स्पर्धेतून माघार घेत असल्याचे ट्विट केले. मुंबई इंडियन्सने त्याचा बदली खेळाडू जाहीर केलेला नाही.
११ सामन्यांत २ विजयांसह तळाला असलेल्या मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमारने चांगली कामगिरी केली आहे. त्याने ८ सामन्यांत ४३.२९च्या सरासरीने ३०३ धावा केल्या आहेत. त्याने तीन अर्धशतकं झळकावली आहेत आणि यंदाच्या पर्वात MI कडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमारला आधीही हाताच्या दुखापतीमुळे दोन सामन्यांना मुकावे लागले होते. ''डाव्या हाताच्या स्नायूंना दुखापत झाली आहे आणि त्यामुळे त्याने माघार घेतली आहे. बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमसोबत सल्लामसलत केल्यानंतर त्याला विश्रांतीचा सल्ला दिला गेला आहे,''असे फ्रँचायझीने सांगितले.
आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही मुकणारआगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन बीसीसीआय आतापासूनच संघबांधणी करत आहे. आयपीएलनंतर सातत्याने होणाऱ्या मालिका लक्षात घेता बीसीसीआय काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याच्या विचारात आहेत. त्यात आता सूर्यकुमारला दुखापत झाल्याने ९ मे पासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. ''त्याची दुखापत किंचितशी गंभीर आहे आणि त्याला विश्रांतीची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत तो आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध नसेल. त्याच्याबाबतीत आम्हाला कोणतीच घाई करायची नाही,''असे निवड समितीती एका सदस्याने InsideSportला सांगितले. तो आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल.
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक
- पहिली ट्वेंटी-२० - ९ जून, दिल्ली
- दुसरी ट्वेंटी-२० - १२ जून, कटक
- तिसरी ट्वेंटी-२० - १४ जून, विझाक
- चौथी ट्वेंटी-२० - १७ जून, राजकोट
- पाचवी ट्वेंटी-२० - १९ जून, बंगळुरू