दुबई : भारताचा ३६० डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादव याने आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या टी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. यासह तो आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकासह फलंदाजीस उतरेल. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानने आपले अव्वल स्थान कायम राखले. दुसरीकडे,गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार भारताचा अव्वल गोलंदाज ठरला आहे.
न्यूझीलंडमध्ये झालेल्या त्रिकोणी टी-२० मालिकेत पाकिस्तानच्या रिझवानने कमालीचे सातत्य राखले. या जोरावर त्याने अव्वल स्थान भक्कम केले. त्याच्या खात्यात ८६१ गुण आहे. सूर्या ८३८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. लोकेश राहुल (१३), विराट कोहली (१५) व रोहित शर्मा (१६) या भारतीयांनी आपले स्थान कायम राखले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानी असून दक्षिण आफ्रिकेचा एडेन मार्करम चौथ्या, तर न्यूझीलंडचा डीवोन कॉन्वे पाचव्या स्थानी आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार अव्वल भारतीय ठरला असून तो १२ व्या स्थानी कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड (७०५) अव्वल स्थानी आहे.
हार्दिक पांड्या सहाव्या स्थानीअष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताच्या हार्दिक पांड्याने सहावे स्थान कायम राखले आहे. त्याच्या खात्यात १७३ गुण आहेत. बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन अव्वल अष्टपैलू ठरला असून त्याने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला मागे टाकले आहे. शाकिबने न्यूझीलंडमध्ये झालेल्या त्रिकोणी टी-२० मालिकेत दमदार कामगिरीच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले.