Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2023: भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू आता ३१ मार्चपासून पुन्हा मैदानात उतरणार आहेत. इंडियन प्रीमियर लीग (IPL-2023) चा 16 वा सीझन 31 मार्चपासून सुरू होत आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येने खेळाडू आपली कला दाखवताना दिसतील. या मोसमातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या दरम्यान, मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाऊचरने कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवबाबत एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
जगातील सर्वात श्रीमंत टी२० लीग आयपीएलचा 16 वा हंगाम 31 मार्चपासून सुरू होणार आहे. गेल्या मोसमाप्रमाणे या लीगमध्ये 10 संघ सहभागी होत आहेत. हंगामातील पहिला सामना गतविजेता गुजरात टायटन्स आणि 4 वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे. CSK चे नेतृत्व अनुभवी महेंद्रसिंग धोनी (MS धोनी) करत आहे, तर गुजरात संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे आहे. दरम्यान, लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी सूर्यकुमारच्या संघातील समावेशाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
सूर्यकुमार यादव खेळणार की नाही? कोच म्हणतात...
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीबद्दल अलीकडेच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वास्तविक, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत वाईटरित्या फ्लॉप झाला आणि तीनही सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होऊन शून्यावर माघारी परतला. आता मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी त्याच्याबद्दलच्या प्रश्नावर उत्तर देताना, त्याचा बचाव केला आहे. 'खेळाडूचा फॉर्म हा तो पहिला चेंडू कसा खेळतो यावरून ठरवता येत नाही,' असे सूचक विधान सूर्यकुमार यादवबद्दल बाउचरने केले. यावरूनच प्रशिक्षक बाउचर सूर्यकुमारच्या बाजूने असून त्याला या मोसमात पूर्ण संधी दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सूर्यकुमारबाबत अधिकची माहिती...
मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक बाउचर म्हणाला, "सूर्यकुमार यादव आता पूर्णपणे फिट आणि तंदुरूस्त आहे. तो पहिला चेंडू कसा खेळतो या आधारावर तुम्ही खेळाडूच्या फॉर्मचा अंदाज करूच शकत नाही. असे केल्यास त्या खेळाडूच्या कलेला किंवा प्रतिभेला तुम्ही न्याय देऊ शकत नाही. मी त्याच्याशी (सूर्यकुमार) बोललो आहे. मी विचारले की त्याला सध्या कसे वाटते? तो म्हणाला- 'मी खूप चांगल्या मनस्थितीत आहे आणि सराव सत्रात खूपच चांगल्या पद्धतीने चेंडू मारतोय.' असे असेल तर हे संघासाठी नक्कीच चांगले आहे."
वन डे मालिकेत अयशस्वी पण...
बाउचर पुढे म्हणाला, "जर एखादा खेळाडू पहिला चेंडू खेळू शकला नाही, तर तो खेळाडू फॉर्ममध्ये नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. दुर्दैवाने गेल्या तीनही सामन्यांत त्याला फारसे खेळायलाच मिळाले नाही. पहिल्याच चेंडूवर खेळाडू बाद झाला तर त्याचे ते दुर्दैवच म्हणावे लागेल. त्याला स्वत:ला सिद्ध करायचे होते पण त्याला तसे करता आलेले नाही. आशा आहे की, जेव्हा तो IPL मध्ये पहिल्या चेंडूला सामोरा जाईल, तेव्हा प्रेक्षक त्याला सपोर्ट करतील आणि तोदेखील प्रेक्षकांच्या व संघाच्या आशा-अपेक्षा पूर्ण करेल."
मुंबई इंडियन्सचा संघ-रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, टीम डेव्हिड, डेवॉल्ड ब्रेव्हिस, तिलक वर्मा, ट्रिस्टन स्टब्स, कॅमेरून ग्रीन, जोफ्रा आर्चर, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, रमणदीप सिंग, झाय रिचर्डसन, राघव गोयल