भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर भिडणार म्हटलं की क्रिकेट वर्तुळाची उत्सुकता शिगेला पोहचते. प्रत्येकजण या बहुचर्चित सामन्याचा साक्षीदार होण्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून सामन्याचा आनंद लुटतो. वन डे विश्वचषक २०२३ मध्ये शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. मोठा सामना असल्याने तीन-चार महिने आधीपासूनच चाहत्यांनी तिकिटे बुक करण्यास सुरूवात केली. तिकिटे मिळावी म्हणून खेळाडूंचा मित्रपरिवार त्यांना विनवणी करत असतो. अनेकदा याचा प्रत्यय आला आहे. विराट कोहलीने देखील पत्रकार परिषदेत याबाबत उघडपणे भाष्य केले होते. आता सूर्यकुमार यादवने देखील तिकिटांसाठी विनवणी करू नका असे आवाहन केले आहे.
सूर्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी ठेवत जवळच्या लोकांना हा सल्ला दिला. त्याने म्हटले, "सगळ्यांच्या घरी चांगले टीव्ही आहेत... त्यामुळे मजा घ्या आणि एसीमध्ये बसून सामना पाहा. आणखी कोणीही तिकिटांसाठी विनवणी करू नका."
दरम्यान, उद्या वन डे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. आजारपणामुळे पहिल्या दोन सामन्याला मुकलेला शुबमन गिल पाकिस्तानविरूद्ध खेळणार का हे पाहण्याजोगे असेल. दोन्ही संघ प्रत्येकी २-२ सामने जिंकून इथपर्यंत पोहचले आहेत. यजमान भारताने ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केला, तर पाकिस्तानने नेदरलॅंड्स आणि श्रीलंकेला पराभूत करून यजमानांशी भिडण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. खरं तर वन डे विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानला कधीच भारताविरूद्ध विजय मिळवला आलेला नाही. त्यामुळे टीम इंडिया देखील शेजाऱ्यांविरूद्धचा विजयरथ कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव.
वन डे विश्वचषकातील भारताचे पुढील सामने -
भारत विरुद्ध पाकिस्तान - १४ ऑक्टोबर, अहमदाबाद
भारत विरुद्ध बांगलादेश - १९ ऑक्टोबर, पुणे
भारत विरुद्ध न्यूझीलंड - २२ ऑक्टोबर, धर्मशाला
भारत विरुद्ध इंग्लंड - २९ ऑक्टोबर, लखनौ
भारत विरुद्ध श्रीलंका - २ नोव्हेंबर, मुंबई
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - ५ नोव्हेंबर, कोलकाता
भारत विरुद्ध नेदरलँड्स - १२ नोव्हेंबर, बंगळुरू
Web Title: Suryakumar Yadav urges no request for tickets ahead of IND vs PAK match in ICC ODI world cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.