ICC Men's Player Rankings - भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर यांनी बुधवारी जाहीर झालेल्या ICC Men's Player Rankings मध्ये गरूड झेप घेतली. या दोघांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी करून दाखवली आणि भारताने ही मालिका ३-० अशी सहज जिंकली. सूर्यकुमारने या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा केल्या, तर वेंकटेश अय्यर दुसऱ्या क्रमांकावर राहिला.
पहिल्या सामन्यात भारताच्या ३ विकेट्स चार षटकांत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमारने ४५ चेंडूंत ६५ धावांची खेळी केली आणि यादव व अय्यर या जोडीने सामना जिंकून दिला. शेवटच्या सामन्यात भारताची अवस्था ४ बाद ९४ अशी झाली होती. त्यानंतर यादव-अय्यर जोडीने ३७ चेंडूंत ९१ धावांची भागीदारी करताना भारताला ५ बाद १८४ धावांचा टप्पा गाठून दिला. यादवने ३१ चेंडूंत ६५ धावा, तर अय्यरने १९ चेंडूंत ३५ धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर सूर्यकुमार यादवने ३५व्या क्रमांकावरून २१व्या स्थानी झेप घेतली, तर अय्यर २०३ क्रमांकावरून ११५ व्या स्थानी पोहोचला. वेस्ट इंडिजकडून एकटा खिंड लढवणारा निकोलस पूरन पाच क्रमांकाच्या सुधारणेसह १३व्या स्थानी पोहोचला.
ऑस्ट्रेलियाने नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० मालिकेत श्रीलंकेवर ४-१ असा विजय मिळवला आणि या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अॅश्टन अॅगरने ९व्या क्रमांकावर कूच केली. अॅगरने अखेरच्या दोन सामन्यांत १-१४ व १-१९ अशी कामगिरी केली. श्रीलंकेचा महीश तीक्ष्णा यानेही १२ स्थानांच्या सुधारणेसह १७वे क्रमांक पटकावले. ओमानचा कर्णधार झिशान मक्सूदने ICC Men's T20 World Cup Qualifier A स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केली आणि तो ६व्या क्रमांकावर पोहोचला आहे.