भारतीय टी 20 क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सुट्टीचा आनंद घेण्यासाठी थेट अमेरिकेला गेला आहे. क्रिकेटरनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन न्यूयॉर्कच्या यांकी स्टेडियमवरील अविस्मरणीय क्षणाची खास झलक शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादव मेजर लीग बेसबॉलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या न्यूयॉर्क यांकीजच्या खेळाडूंसोबत दिसतो आहे.
अमेरिकेत खास अंदाजात झाल स्वागत
बेसबॉलमधील लोकप्रिय संघाने टी-20 क्रिकेटमधील भारताच्या धडाकेबाज फलंदाजाचे आपल्या घरच्या मैदानात खास अंदाजात स्वागत केल्याचे. पाहायला मिळाले. जर्सी भेट देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. सूर्यकुमार यादवला जी जर्सी भेट देण्यात आली त्या जर्सीवर ६३ क्रमांकासह सूर्या असं नावही लिहिल्याचे दिसून येते.अमेरिकेत बेसबॉल हा खेळ खूपच लोकप्रिय आहे. पण या खेळाशी संबंधित खेळाडू आणि संघाने क्रिकेटरचा अगदी उत्साहाने गौरव करणं खरंच मोठी गोष्ट आहे.
अमेरिकन मंडळी आता क्रिकेटला ओळखू लागली
क्रिकेटला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने २०२४ मध्ये टी २० वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने अमेरिकेतही खेळवण्यात आले होते. अमेरिका आणि वेस्ट इंडीजच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा पार पडली होती. त्यानंतर तिथंही क्रिकेटची क्रेझ हळूहळू निर्माण होताना दिसत आहे. अमेरिकेतील मंडळी आता क्रिकेटरला ओळखू लागली आहेत. सूर्यकुमार यादवनं शेअर केलेला व्हिडिओ त्याचाच एख पुरावा आहे.
याआधी टी-२० वर्ल्ड कपमध्ये केला होता अमेरिकेचा दौरा
अमेरिका दौऱ्यावर सूर्यकुमार यादवनं बेसबॉल स्टेडियमला भेट देऊन दोन्ही खेळातील कनेक्शनचा खास नजराणा जगाला दाखवून दिला आहे. याआधी सूर्यकुमार यादव टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचा दौरा केला होता. श्रीलंका दौऱ्यावरील टी-20 क्रिकेट मालिकेपासून भारतीय संघाची धूरा ही सूर्याच्या खांद्यावर आली आहे. सूर्या-गंभीर पर्वाची सुरुवातही दमदार झाली.
प्रमोशन मिळाले, पण वनडेतील पत्ता झाला कट
रोहित शर्मा याच्यानंतर भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व हे सूर्यकुमार यादवकडे आले आहे. पण एकदिवशीय संघात स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरलाय. गंभीर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर आल्यापासून टीम इंडियात नवे पर्व सुरु झाल्याचे दिसते. टी-२० संघात सूर्याला प्रमोशन देत वनडेतून त्याचा पत्ता कट करण्यात आला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेतील वनड मालिका गमावल्यानंतर सूर्यानं क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. पण सध्यातरी त्याच्यासाठी हे काम कठीणच दिसते. कारण की, टी-२० प्रमाणे वनडेत त्याला म्हणावी तशी छाप सोडता आलेली नाही.