भारतीय टी-२० संघाची कॅप्टन्सीसह मिरवणारा सूर्यकुमार यादव आता कसोटी संघात स्थान पक्के करण्यासाठी कंबर कसताना दिसतोय. कसोटी संघातील कमबॅक करण्यासाठी तो आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली क्षमता दाखवून देण्यासाठी तयार आहे. बुची बाबू स्पर्धेसह तो आपली प्रतिक्षा संपवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकतोय. त्यानंतर तो दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेतही खेळताना दिसणार आहे. लाल चेंडूवर खेळण्याला आजही प्राधान्य देतो, असे म्हणत त्याने कसोटी संघात पुन्हा खेळण्यासाठी जोर लावत असल्याचे बोलून दाखवले आहे.
सूर्यासाठी कसोटी संघाची वाट काटेरी, कारण इथं उभे आहेत त्याचेच अनेक सहकारी
सूर्यकुमार यादवला टी-२० क्रिकेटमध्यो तो़ड नाही. कॅप्टन्सीच्या रुपात त्याला त्याची पोचपावतीही मिळालीये. पण कसोटी संघात स्थान मिळवणं त्याच्यासाठी सोपी गोष्ट नाही. कारण त्याच्या वाटेत टीम इंडियातील त्याचे सहकारी त्याला तगडी फाईट देताना दिसतील. त्याच्यासोर एक दोन खेळाडूंचे आव्हान नाही. तर मोठी फौजच त्याच्या वाटेत अडथळा निर्माण करण्यासाठी सज्ज आहे. कारण या मंडळींनाही कसोटी संघात आपली जागा पक्की करायची आहे.
सूर्यकुमार यादवसमोर या खेळाडूंचे असेल चॅलेंज
कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी सूर्यकुमार यादवसमोर सरफराज खान, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, रजत पाटीदार यासारखे खेळाडू मोठे आव्हान निर्माण करू शकतात. ही मंडळी सूर्यकुमारच्या एक पाऊल पुढे आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची बॅट तळपली तर सूर्याची गणित बिघडू शकतात. चॅलेंज मोठं असलं तरी सूर्यानं अजून हार मानलेली नाही. त्यामुळेच तो आता बुची बाबू स्पर्धेसाठी कोईम्बतूरला दाखल झाला आहे. त्याने मुंबई संघाच्या ट्रेनिंग सेशनमध्ये भागही घेतला.
काय म्हणाला सूर्यकुमार?
ईएसपीएनक्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव म्हणाला आहे की, संघात निवड होणं माझ्या हातात नाही. पण बुची बाबू आणि दुलीप करंडक स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करुन मी कमबॅकसाठी प्रयत्नशील आहे. लाल चेंडूवर खेळण्याला मी सुरुवातीपासून प्राधान्य दिले आहे. मागील दहा वर्षांत खूप प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलो आहे. मुंबईकडून खेळताना पुन्हा संधीच सोन करण्यासाठी तयार आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंनी टीम इंडियात कमबॅ केले आहे, असे सांगत त्याने सकारात्मकरित्या मैदानात उतरून अनेकजण भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्या शर्यतीत आपणही आहोत, हेच त्याने सांगितले आहे.