Suryakumar Yadav Team India, IND vs SL 2nd ODI: भारतीय संघ गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात मालिका जिंकण्याच्या इराद्याने उतरणार आहे. पहिल्या सामन्यात विराट कोहलीच्या शानदार शतकाच्या बळावर टीम इंडियाने श्रीलंकेचा ६७ धावांनी पराभव केला. आता सर्वांच्या नजरा कोलकाता येथे होणाऱ्या सामन्याकडे लागल्या आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपल्या Playing XI मध्ये काही बदल करणार का हे पाहावे लागेल. टी२० फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या सूर्यकुमार यादवला पहिल्या सामन्यात स्थान मिळाले नव्हते. वन डे संघात स्थान मिळवणे सूर्याला काहीसे कठीणच जात आहे. सूर्या टी२० मध्ये कितीही चांगला खेळत असला तरी त्याला सध्याच्या वन डे मालिकेत संधी मिळणं कठीण आहे. जाणून घेऊया त्यामागचं खास कारण.
TOP 3 ची चमकदार कामगिरी
पहिल्या सामन्यात, टॉप ३ फलंदाजांनी टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली होती, अशा परिस्थितीत प्लेइंग-11 बदलणे कठीणच आहे. कर्णधार रोहित शर्माने ८३ धावांची खेळी खेळली, त्याचे शतक हुकले पण तो चांगल्या लयीत दिसला. विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर त्याने सलग दोन शतके झळकावली आहेत आणि हा ट्रेंड कायम राहील अशीच अपेक्षा आहे. त्यामुळे त्यालाही संघाबाहेर बसवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इशान किशनच्या जागी युवा सलामीवीर शुभमन गिलला खेळवण्यात आले. त्याने त्याची निवड सार्थ ठरवली. ६० चेंडूत ७० धावा केल्या.
चौथ्या क्रमांकावर सूर्यापेक्षाही श्रेयस सरस
पहिल्या सामन्यात टॉप३ फलंदाजांनी धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर असलेला श्रेयस अय्यर फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही, पण त्याने गेल्या वर्षभरात वन डे क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत सूर्यकुमार यादवला जागा मिळणे कठीणच आहे. पाचव्या क्रमांकावर केएल राहुल संघात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत आहे. रिषभ पंत नसल्याने त्याला नवीन जबाबदारी मिळाली आहे. संघात बदल करायचा झालाच, तर यष्टीरक्षक म्हणून इशानला संघात घेतले जाऊ शकते. आणि सहाव्या क्रमांकावर हार्दिक पांड्या खेळत आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादवला टॉप ६ मध्ये स्थान नाही.
भारताचा संघ:रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग