नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघात कमी कालावधीत मोठे यश प्राप्त केलेला खेळाडू म्हणजे सूर्यकुमार यादव. मात्र, यशापर्यंतचा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. सराव करतानाही तो प्रत्यक्ष सामन्यासारखे क्षेत्ररक्षण लावण्याभर भर द्यायचा. मग त्यानुसार, फलंदाजी करायचा. विशेष म्हणजे, सरावादरम्यान एकदा बाद झाला की, तो पुन्हा फलंदाजीला येत नसे, अशी माहिती त्याच्या प्रशिक्षकांनी दिली आहे.
सूर्याच्या बालपणीचा मित्र आणि राज्य संघातील सहकारी सुफियान शेखनेही त्याच्या कार्यशैलीवर प्रकाश टाकला. तो म्हणाला, २००९ साली तो पारसी जिमखान्याला क्रिकेट खेळायला पोहोचला, तेव्हा थोडासा बेचैन होता. मात्र, तेव्हाही त्याच्याकडे फटक्यांची विविधता होता आणि तो एक दिवस भारतासाठी खेळेल, याचा सर्वांना विश्वास होता.
सूर्याचे कोच माने म्हणाले, तो नेहमी सांगायचा की, सरावादरम्यान माझ्यासमोर लक्ष्य ठेवा, जेणेकरून मला त्यानुसार फलंदाजी करायची आहे. त्यामुळे आम्ही कमी चेंडूंत जास्त धावांचे लक्ष्य त्याच्यासमोर ठेवायचो. तोही यासाठी पूर्ण तयार असायचा. तेव्हापासूनच तो विविध फटके खेळण्याचा प्रयत्न करायचा. सूर्याचे डोकं प्रत्यक्ष सामन्यात कसे चालते, यावर दोघंही म्हणाले, परिस्थितीनुसार तो स्वत:च्या फलंदाजीत सहज बदल करू शकतो. ही क्षमता त्याने अथक सरावातून विकसित केली आहे, शिवाय सामना अटीतटीचा असला, तरी सूर्याचे डोकं थंड असते. त्याचा स्वत:वर प्रचंड विश्वास आहे.