दुबई : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने नव्याने जाहीर झालेल्या टी-२० क्रमवारीत आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात सामनावीर ठरूनही सूर्याचे दोन गुण कमी झाले.
रांची येथे झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातील नाबाद ४७ धावांच्या खेळीच्या जोरावर सूर्याचे गुण ९१० झाले होते. मात्र, नंतर दुसऱ्या सामन्यात नाबाद २६ धावांची खेळी करूनही त्याचे गुण ९०८ इतके झाले. त्याचवेळी, टी-२० मध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या फलंदाजांमध्ये आता तो दुसऱ्या स्थानी आला आहे. इंग्लंडच्या डेव्हिड मलानने २०२० मध्ये ९१५ गुण मिळवले होते. हा विक्रम मोडण्याची मोठी संधी सूर्याकडे आली आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धेत सहा सामन्यांत २३९ धावा फटकावत सूर्यकुमार अव्वलस्थानी झेप घेतली होती. यानंतर आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू पुरस्कारावरही त्याने कब्जा केला होता.
इतर कोणताही भारतीय फलंदाज अव्वल दहामध्ये स्थान मिळवू शकला नाही. फलंदाजांमध्ये पहिल्या सात स्थानांमध्ये कोणतेही बदल झाले नसून ऑस्ट्रेलियाच्या ॲरोन फिंचने एका स्थानाने प्रगती करत आठवे स्थान मिळवले. त्याने न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सला मागे टाकले. विराट कोहली हा सूर्यकुमारनंतरचा आघाडीचा भारतीय फलंदाज ठरला असून, तो १४व्या स्थानी कायम आहे.