CM Eknath Shinde on Team India : टीम इंडियाने तब्बल 17 वर्षांनंतर T-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयानंतर सर्व खेळाडूंसाठी काल(दि.4) मुंबईत भव्यदिव्य विजयी परेड आयोजित करण्यात आली होती. यानंतर आज(दि.5) महाराष्ट्र विधान भवनात कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) चार मुंबईकर खेळाडूंचा सर्व आमदारांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी तुफान फटकेबाजी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात सूर्यकुमार यादवाच्या (Suryakumar Yadav) कॅचचा उल्लेख करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) बोचरी टीका केली. "गेल्या 2 वर्षांपासून आम्हीही बॅटींग करत आहोत. सूर्यकुमार यादवचा तो कॅच जसा विसरता येणार नाही, तसेच 2 वर्षांपूर्वी आम्ही 50 जणांच्या टीमने काढलेली विकेटही विसरता येणार नाही," असे शिंदे म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला.
मुंबईकरांचा विशेष अभिमान
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, 17 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आपण वर्ल्डकप जिंकला. कोणाला विश्वास बसणार नाही, पण मी अंतिम सामना पूर्ण पाहिला. भारतीय संघात मुंबईतील चार खेळाडू होते, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे. संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हेही आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत. काल अरबी समुद्राच्या बाजुला मुंबईकरांचा महासागर उसळला होता. ते पाहून आम्हालाही धडकी भरली होती, कारण एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईकर रस्त्यावर येतील, असे कोणालाही वाटले नव्हते. पण, वाहतुकीचे नियोजन आणि सर्वकाही सुरळीत पार पाडल्याबद्दल मी मुंबईच्या पोलिसांचे अभिनंदन करतो. भारत हा क्रिकेटचा विश्वगुरु आहे आणि मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. काल क्रिकेटप्रेमी वारकरी मुंबईकडे निघाले होते, असे वर्णन मुख्यमंत्र्यांनी कालच्या गर्दीचे केले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संबोधनाची सुरुवात रंजक पद्धतीने केली. मुख्यमंत्र्यांच्या उल्लेख महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख व्हाइस कॅप्टन अजित पवार असा केला. तसेच सभागृहातील आपले अंपायर राहुल नार्वेकर, थर्ड अंपायर नाही म्हणता येणार त्यांना, अंपायरच म्हणावे लागेल, अंपायर नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजींना काय म्हणायचे? असा खोचक सवाल करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अशी नावे घेतली. तसेच रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचेही स्वागत केले. तसेच आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. अपराजित टीमने टी-20 वर्ल्ड कप जिंकला, त्या संघाच्या कर्णधारासह चार खेळाडूंचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. कर्णधार रोहित शर्माने एकाच दिवशी आनंद आणि दु:खही दिले. वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून आनंद आणि यापुढे आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणार नाही, असे सांगून दु:खही दिले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
"तर मी सूर्याला बसवलं असतं.."; विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग, सभागृहात पिकला हशा
Web Title: 'Surya's catch and the wicket taken by us 50 men 2 years ago', CM Eknath Shinde's harsh criticism on Shivsena Uddhav Tackeray
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.