लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : लोकमत समूहाच्या औरंगाबाद प्रीमियर क्रिकेट लीगपासून प्रकाशझोतात आलेला मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज सुशांत मोदानी याची अमेरिकेच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत तो अमेरिकन संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
१९ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणारा सुशांत २०१६ जूनमध्ये नोकरीनिमित्त अमेरिकेत गेला. ३ वर्षांपासून तो टेक्सास राज्यातील डायलस येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करीत आहे. नोकरीदरम्यान त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला विशेष ठसा उमटवला. या जोरावर त्याची याच वर्षी जानेवारी महिन्यात अमेरिकेच्या संभाव्य संघात निवड झाली होती. त्यानंतर त्याने अमेरिकेच्या प्रमुख संघात स्थान निश्चित केले.. तसेच एपीएलच्या अनुभवामुळे आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे सुशांत मोदानी याने अमेरिकेच्या डायलस येथून लोकमतशी बोलतांना सांगितले.
एपीएलमध्ये होता मालिकावीरलोकमत समूहातर्फे आयोजित औरंगाबाद क्रिकेट स्पर्धेने त्याच्या गुणवत्तेला मोठे व्यासपीठ मिळवून दिले. उल्लेखनीय म्हणजे संधीचे सोने करताना त्याने नेतृत्वाची धुरा यशस्वीपणे राजुरी स्टील संघाला विजेतेपद पटकावून दिले. या स्पर्धेत त्याला लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते मालिकावीरासाठी असलेली नॅनो कार बक्षिसाच्या रूपाने देण्यात आली. या स्पर्धेत त्याला माजी रणजीपटू अनंत नेरळकर यांचे मार्गदर्शन लाभले होते.