मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्याच्या अशा अचानक जाण्यामुळे त्याच्या अनेक भूमिका आज चाहत्यांच्या नजरेसमोर येत आहेत. त्यापैकी सुशांतसिंह राजपूनते साकारलेली धोनीची भूमिका तर खूपच लोकप्रिय झाली होती. या भूमिकेसाठी सुशांतने भाराताच्या एका माजी क्रिकेटपटूकडून क्रिकेटचेही धडे घेतले होते. दरम्यान, सुशांतच्या अशा अचानक जाण्याने त्यांनाही धक्का बसला आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेल्या एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत घेतली होती. रियल लाईफमधला धोनी रील लाईफमध्ये पडद्यावर साकारणे तितकेसे सोपे नव्हते. त्यासाठी सुशांतने फिटनेसवर मेहनत घेतली होती. धोनीचे हावभाव, त्याच्या फलंदाजीची स्टाईल आत्मसात केली होती. इतकेच नव्हे तर धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट खेळण्यामध्येही त्याने हातखंडा मिळवला होता, हे सर्व शिकण्यासाठी त्याने क्रिकेटचे सुमारे वर्षभर प्रशिक्षण घेतले होते. त्याला क्रिकेटचे धडे शिकवणारे माजी क्रिकेटपटू होते भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे. दरम्यान, मोरे यांनी सुशांतसिंह राजपूतच्या अचानक जाण्याबाबत दु:ख व्यक्त केले आहे.
ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये किरण मोरे म्हणतात की,’’सुशांतसिंह राजपूतचं जाणं वैयक्तिकदृष्ट्या माझ्यासाठीदेखील धक्कादायक आहे. चित्रपटात महेंद्रसिंह धोनीची भूमिका साकारण्यासाठी मी त्याला क्रिकेटचे प्रशिक्षण दिले होते. त्याच्या जाण्याने आज बसलेल्या धक्क्यातून कसे सावरायचे हे मला आणि त्याला ओळखणाऱ्या कुणालाही माहीत नाही. मित्रा तू खूप लवकर निघून गेलास,’’
दरम्यान, एक गुणवान अभिनेता अशी ओळख असलेल्या सुशांतने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये यादगार भूमिका केल्या होत्या. मात्र त्यापैकी खास ठरली होती ती महेंद्रसिंह धोनीचा बायोपिक असलेल्या एम. एस. धोनी द अनटोल्ड स्टोरीमधील धोनीची भूमिका. सुशांतसिंह राजपूतने या भूमिकेमध्ये अक्षरश जीव ओतून रिअल लाईफमधला धोनी रिल लाईफमधील पडद्यावर जिवंत केला होता.
या चित्रपटातील क्लायमॅक्स सिन असलेल्या २०११ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यातील क्षेवटच्या क्षणांचे चित्र सुशांतने हुबेहूब धोनीस्टाईल सिक्स मारून उभे केले होते. त्यामुळे आजही जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर लागतो तेव्हा भारताने विश्वचषक जिंकल्याचा फिल येतो.