मुंबई : भारतीय संघाचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ हा उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी आढळला असून त्याला 8 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आल्याची कारवाई बीसीसीआयनं केली आहे. त्याची बंदी 15 नोव्हेंबर 2019 ला संपणार आहे. कफ सिरप घेत असताना त्यातून नकळत पृथ्वीच्या शरीरात उत्तेजक द्रव्य गेल्याचं बीसीसीआयनं म्हटलं. या प्रकरणी वाडा संघटनेच्या नियमानुसार पृथ्वी दोषी आढळला. पण, पृथ्वीवर करण्यात आलेली कारवाई ही तर थट्टा असल्याचं मत भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्रानं व्यक्त केलं.
सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेदरम्यान पृथ्वीच्या लघवीचा नमुना घेण्यात आला. 22 फेब्रुवारी 2019 रोजी इंदूरमध्ये ही चाचणी घेण्यात आली. यातून पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटलाइन असल्याचं निष्पन्न झालं. टर्ब्युटलाइनचा समावेश वाडानं प्रतिबंधित द्रव्यांमध्ये केला आहे. त्यामुळे बीसीसीआयनं उत्तेजक द्रव्यविरोधी नियमांतर्गत पृथ्वीवर कारवाई केली. पण, पृथ्वीवरील निलंबन हे मार्च महिन्यापासून लागू झाली असून ती नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. दरम्यान या काळात पृथ्वीनं आयपीएल दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व केले, तर तो मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळला होता. त्यामुळे बीसीसीआयनं पृथ्वीला आयपीएलमध्ये खेळता यावे यासाठी हा अहवाल दाबून ठेवला का?
पृथ्वी शॉसोबतच अक्षय दुल्लारवार (विदर्भ) आणि दिव्या गजराज (राजस्थान) सुद्धा उत्तेजक द्रव्य सेवनात दोषी आढळले आहेत. त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अक्षय दुल्लारवारला 9 नोव्हेंबरपर्यंत तर दिव्या गजराजला 25 सप्टेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. आकाश चोप्रानंही हाच मुद्दा उचलत ही कारवाई म्हणजे थट्टा असल्याचं मत व्यक्त केलं. तो म्हणाला,''पृथ्वी शॉ प्रकरणात पाच महिन्यांचा कालावधी का लागला? एप्रिल-मेमध्ये आयपीएल खेळवण्यात आली आणि त्यानंतर मुंबई ट्वेंटी-20तही झाली. पृथ्वी या दोन्ही स्पर्धांमध्ये खेळला. त्यामुळे पूर्वलक्षी निलंबन हा थट्टेचाच भाग आहे.''
बंदीच्या निर्णयावर पृथ्वी शॉचं उत्तर, म्हणाला...पृथ्वी म्हणाला," सय्यद मुश्ताक स्पर्धेदरम्यान मला सर्दी खोकल्याचा त्रास झाला होता. त्यावेळी मी औषध घेतले त्यात बंदी घातलेल्या द्रव्य निष्पन्न झाले. बीसीसीआयच्या नियमाचे मी अप्रत्यक्षिकपणे उल्लंघन केले. मला माझी चूक मान्य आहे. खेळाडूने किती सतर्क राहायला हवं याचा धडा मला शिकायला मिळाला."